ड्रग्सविरोधात राज्याचा एल्गार! दोन ते चार वर्षांत ‘ड्रग फ्री मुंबई’चे लक्ष्य
मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार

ड्रग्सविरोधात राज्याचा एल्गार! दोन ते चार वर्षांत ‘ड्रग फ्री मुंबई’चे लक्ष्य; मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार
मुंबई | प्रतिनिधी
देशाच्या युवा शक्तीला अमली पदार्थांच्या विळख्यात अडकविण्याचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वरळी येथील डोममध्ये गुरुवारी ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ करताना त्यांनी पुढील दोन ते चार वर्षांत मुंबईला अमली पदार्थमुक्त करण्याचे लक्ष्य जाहीर केले.
“नशामुक्तीचा लढा हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भविष्यासाठीचा सामूहिक लढा आहे,” असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात ड्रग्सची विक्री करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करून त्यांचा संपूर्ण नायनाट केला जाईल, असा इशारा दिला. तसेच ‘ड्रग फ्री स्कूल’ आणि ‘ड्रग फ्री कॅम्पस’ उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार असून, ड्रग्सविषयी माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना पुरस्कारही दिला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार विद्यार्थ्यांनी अमली पदार्थमुक्तीची शपथ घेतली, तर चार हजारांहून अधिक शाळा-महाविद्यालयांतील सुमारे पाच लाख विद्यार्थी, पालक आणि नागरिक ऑनलाइन सहभागी झाले.
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘ड्रग फ्री मुंबई’ ही लोकचळवळ बनविण्याचे आवाहन करत, १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘सीएम महाधन’ कौशल्य विकास योजनेत पहिल्या टप्प्यात एक लाख युवक-युवतींना प्रशिक्षण व स्वयंरोजगारासाठी सहाय्य दिले जाणार असल्याची माहिती दिली.