गणेश मंडपातच होणार आरोग्य तपासणी; महिलांची स्तन कर्करोग तपासणीही मोफत ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम; गरजू भक्तांना मोफत चष्मेही मिळणार
मुंबई महापालिकेची गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी; ४४ समुद्रकिनारे, २३ नैसर्गिक आणि २८१ कृत्रिम विसर्जन स्थळे सज्ज

प्रतिनिधी/ मुंबई :
गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसोबतच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेत मुंबई महापालिकेने यंदाच्या गणेशोत्सवासाठी विशेष नियोजन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार असून, सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपात किंवा परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबिरांमध्ये डोळ्यांची तपासणी, गरजूंना मोफत चष्मे तसेच महिलांसाठी स्तन कर्करोगाची तपासणी केली जाणार आहे. या उपक्रमासाठी गणेश मंडळांनी मंडपात किंवा परिसरात जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले.
‘श्रीगणेशोत्सव २०२६’च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी मुंबई महापालिका मुख्यालयात महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. गणेश मंडळांचे पदाधिकारी, मूर्तिकार संघटनांचे प्रतिनिधी, महापालिका अधिकारी, पोलीस आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांसह विविध प्राधिकरणांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.
गणेशोत्सवात पार्किंगपासून खड्ड्यांपर्यंत विशेष लक्ष
गणेशोत्सव काळात भाविकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी वाहनतळांची व्यवस्था करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन सुरळीत पार पडावे, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
यंदा संपूर्ण मुंबईत विशेष मोहीम राबवून रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक सिग्नलची पाहणी केली जाणार आहे. गणेश मंडळांच्या परिसरात येणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडी किंवा रस्त्यांच्या खराब स्थितीचा त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महिलांची मोठी गर्दी लक्षात घेता प्रमुख गणेश मंडळांच्या परिसरात हिरकणी कक्ष आणि प्रसाधनगृहे २४ तास खुले ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
२८१ ठिकाणचे अडथळे हटविले; ४,२७९ खड्डे बुजविले
गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जन मार्गांवर महापालिकेने पूर्वतयारी सुरू केली आहे. आतापर्यंत २८१ ठिकाणच्या अडथळा निर्माण करणाऱ्या केबल्स हटविण्यात आल्या आहेत. आगमन-विसर्जन मार्गावरील ५०६ रस्त्यांवरील ४,२७९ खड्डे आणि १७१ ड्रेनेज कव्हर्सची दुरुस्ती करण्यात आली आहे. याशिवाय ५१५ ठिकाणी वृक्षछाटणी करण्यात आली आहे.
८५८ टन शाडू माती, २५,४०० लिटर पर्यावरणपूरक रंग मोफत
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत मूर्तिकारांना ८५८ टन शाडू माती आणि २५ हजार ४०० लिटर पर्यावरणपूरक रंग विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत.
मंडप परवानगीसाठी ऑनलाइन ‘एक खिडकी प्रणाली’ कार्यान्वित करण्यात आली असून, आतापर्यंत १,१३६ मूर्तिकारांना ऑनलाइन परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी परवानगी घेतलेल्या मंडळांना पुढील पाच वर्षांसाठी एकत्रित परवानगीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
१ सप्टेंबरपर्यंत १,८८५ सार्वजनिक गणेश मंडळांचे अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले असून, पोलीस आणि महापालिका स्तरावर त्यांची छाननी सुरू आहे.
विसर्जनासाठी ३७८ स्थळांची व्यवस्था
गणेशमूर्ती विसर्जनासाठी यंदा ४४ समुद्रकिनारे व जेट्टी, २३ नैसर्गिक तलाव आणि २८१ कृत्रिम विसर्जन स्थळे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
विसर्जनस्थळी १,१९४ स्टील प्लेट, २३ जर्मन तराफे, ३४ क्रेन, ८५ रुग्णवाहिका, १० मोटरबोटी, ४९८ निर्माल्य कलश, ३२६ निर्माल्य डंपर, २६१ स्वागत कक्ष, २२८ नियंत्रण कक्ष आणि ७५ निरीक्षण मनोरे तैनात करण्यात येणार आहेत.
याशिवाय १,१३२ जीवरक्षक, ६,०५२ फ्लडलाईट/सर्चलाईट, ४८९ तात्पुरती प्रसाधनगृहे, ३,११८ मनुष्यबळ आणि ५७६ अधिकारी विसर्जन व्यवस्थेसाठी कार्यरत राहणार आहेत.
क्यूआर कोडवर मिळणार जवळच्या कृत्रिम तलावाची माहिती
नागरिकांना घराजवळील कृत्रिम विसर्जन तलाव शोधणे सोपे व्हावे, यासाठी क्यूआर कोड आणि गुगल मॅपच्या माध्यमातून विसर्जनस्थळांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
६ फुटांपर्यंतच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन बंधनकारक
मुंबई उच्च न्यायालयाच्या २० ऑगस्ट २०२६च्या निर्देशांनुसार, जनहित याचिकेवरील अंतिम निर्णय होईपर्यंत २४ जुलै २०२५ रोजीच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. त्यानुसार ६ फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करणे बंधनकारक असून, त्यासाठी महापालिकेने आवश्यक व्यवस्था केली आहे.
‘गणेशोत्सव भक्तीबरोबर आरोग्याचाही’
यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित, स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा, यासाठी महापालिका प्रशासनाने विविध पातळ्यांवर तयारी सुरू केली आहे. गणेश मंडळांनीही आरोग्य शिबिरांसाठी जागा उपलब्ध करून देत पर्यावरणपूरक आणि सुरक्षित गणेशोत्सवाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले आहे.