एकही पात्र नागरिक मतदार यादीतून वगळले जाणार नाहीत, एकही अपात्र व्यक्तीचा मतदार यादीत समावेश नको , याची दक्षता घ्या
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोक्कलिंगम यांचे निर्देश

मतदार याद्यांच्या सखोल पुनरिक्षण -२०२६ कार्यक्रमाबाबत मुंबईतील निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांचे (ERO) प्रशिक्षण शिबिर संपन्न*
माननीय भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत मुंबईतील मूळ एक कोटी मतदारसंख्येतून मृत अथवा स्थलांतरित सुमारे ३० लाखांहून अधिक मतदारांची नावे कमी झाली आहेत. ही प्रत्यक्ष ‘क्लिनिंग’ प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. मृत अथवा इतरत्र स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७ भरून घेताना संबंधित माहितीची खात्री करून घ्यावी. फॉर्म क्रमांक ७ मध्ये कोणी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध पोलिसात तक्रार द्यावी. तसेच, दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ नंतर वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करून नमुना क्रमांक ६ भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडताना एकही पात्र नागरिक मतदार यादीतून वगळला जाणार नाही आणि एकही अपात्र व्यक्ती मतदार यादीत समाविष्ट होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोक्कलिंगम यांनी दिले आहेत.
मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण -२०२६ कार्यक्रमांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आज (दिनांक २ सप्टेंबर २०२६) विले पार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोक्कलिंगम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई शहर जिल्हा) श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई उपनगर जिल्हा) श्री. सौरभ कटियार, महानगरपालिकेचे सह आयुक्त (कर निर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार आदी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम म्हणाले की, एकही पात्र नागरिक मतदार यादीतून वगळले जाणार नाही आणि कोणतीही अपात्र व्यक्ती मतदार यादीत समाविष्ट होणार नाही, हे निवडणूक आयोगाचे मुख्य धोरण आहे. त्यामुळे प्रारूप मतदार याद्यांबाबत दाखल दावे आणि हरकतींवरील सुनावणीदरम्यान काटेकोरपणे दक्षता घ्यावी. हरकती- सूचानांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावण्यासोबतच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीस उपस्थित राहण्याचे आवाहन करावे. संबंधित व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाला नाही, तर आदेशाची प्रत त्यांच्या व्हॉट्स्ॲप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीस उपस्थित राहण्यात अडचण असल्यास त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीस उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी.
मतदार यादीतून कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव सुटता कामा नये, यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) आपले काम चोख पार पाडावे. नागरिकांना बदललेल्या मतदान केंद्राबाबत माहिती मिळावी, यासाठी सुनावणीची शिबिरे शक्यतोवर नवीन मतदान केंद्रांवर घेण्यास प्राधान्य द्यावे. यामुळे नागरिकांना नवीन मतदान केंद्र शोधताना होणारा संभ्रम टाळता येईल.
मतदारांचे रहिवासी पुरावे पहिल्या टप्प्यात तपासण्यात आले आहेत. त्यामुळे आता नव्याने रहिवासी पुरावे गोळा करण्याची आवश्यकता नाही. केवळ नागरिकत्व (Citizenship) आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी माननीय निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कागदपत्रांच्या यादीतील नागरिकांकडे उपलब्ध असलेले कागदपत्र स्वीकारावे. नागरिकत्वाच्या कागदपत्रांची तपासणी करताना काही शंका असल्यासच कागदपत्रांची सखोल पडताळणी करावी. अर्जांची छाननी करताना उपलब्ध कागदपत्रांच्या आधारेच निर्णय घ्यावा. या मोहिमेदरम्यान चौकशीच्या नावाखाली नागरिकांना विनाकारण त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही श्री. चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले.
दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ नंतर वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करून नमुना क्रमांक ६ भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. यासाठी महाविद्यालय स्तरावर आवश्यक कार्यवाही करावी. नवीन मतदारांबाबत माहिती घेऊन त्यांच्याकडूनच फॉर्म क्रमांक ६ भरून घेण्यासाठी महाविद्यालयांचे सहकार्य घ्यावे, असेही श्री. चोक्कलिंगम यांनी नमूद केले.
सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) आणि निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) यांनी कोणत्याही दबावाला अथवा हस्तक्षेपाला न जुमानता, माननीय निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार अत्यंत पारदर्शक पद्धतीने पुढील दोन महिन्यांत हे काम पूर्ण करावे, असे आवाहन श्री. चोक्कलिंगम यांनी केले.
भायखळा विधानसभा मतदारसंघाचे (१८४) मतदार नोंदणी अधिकारी श्री. कृष्णा जाधव यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थित सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) आणि निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) यांना दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले.
—