मुंबईची मलनिःस्सारण व्यवस्था आता ‘स्मार्ट’; एआय आधीच सांगणार संभाव्य बिघाड
वांद्रेतील एआय-एमएल आधारित माहिती व विश्लेषण केंद्राची डॉ. विपिन शर्मा यांनी केली पाहणी; तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे निर्देश

प्रतिनिधी/मुंबई :
मुंबईतील मलनिःस्सारण व्यवस्था अधिक सक्षम, कार्यक्षम आणि विश्वासार्ह करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जाणार आहे. मलनिःस्सारण उदंचन केंद्रांमध्ये संभाव्य तांत्रिक अडचणी निर्माण होण्यापूर्वीच त्याचा अंदाज घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर महापालिका प्रशासनाने भर दिला आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी बुधवारी वांद्रे येथील अंतर्गामी मलनिःस्सारण उदंचन केंद्रातील एआय आणि मशीन लर्निंग आधारित माहिती व विश्लेषण केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि तंत्रज्ञान भागीदारांना मलनिःस्सारण उदंचन केंद्रांचे काम अधिक कार्यक्षम आणि परिणामकारक करण्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे निर्देश दिले.
बिघाड होण्यापूर्वीच मिळणार संकेत
महापालिकेच्या मलनिःस्सारण प्रचालन विभागाने मेट्रो वेस्ट मॅनेजमेंट आणि आयपंपनेटच्या सहकार्याने वांद्रे येथे हे एआय-एमएल आधारित केंद्र कार्यान्वित केले आहे. या प्रणालीच्या माध्यमातून उदंचन व्यवस्थेशी संबंधित विविध माहितीचे एकत्रीकरण करून त्याचे विश्लेषण केले जाते. त्यामुळे संभाव्य परिचालनात्मक अडचणींची पूर्वकल्पना घेऊन वेळेत उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

यामुळे उदंचन केंद्रांची कार्यक्षमता वाढण्यासोबतच संपूर्ण मलनिःस्सारण व्यवस्थेची विश्वासार्हता आणि सातत्यपूर्ण कार्यक्षमता सुधारण्यास मदत होणार आहे.
आकडेवारीच्या आधारे निर्णय घेण्यावर भर
पाहणीदरम्यान डॉ. शर्मा यांनी माहिती व विश्लेषण केंद्राची कार्यपद्धती, निरीक्षण यंत्रणा, माहितीचे एकत्रीकरण आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मलनिःस्सारण व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली. तसेच केंद्राच्या पूर्वानुमानात्मक विश्लेषण क्षमतेची पाहणी केली.
उपलब्ध माहितीच्या आधारे निर्णय घेणे ही काळाची गरज असून, मलनिःस्सारण उदंचन केंद्रांचे काम अधिक अनुकूलित, कार्यक्षम आणि परिणामकारक करण्यासाठी एआय व मशीन लर्निंगचा अधिकाधिक वापर केला पाहिजे, असे डॉ. शर्मा यांनी स्पष्ट केले.
मुंबईची संपूर्ण मलनिःस्सारण यंत्रणा तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याचा प्रयत्न
वांद्रे येथील प्रयोगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुभवाचा उपयोग मुंबई शहर आणि उपनगरांतील मलनिःस्सारण व्यवस्थेत करण्यावर भर देण्यात येणार आहे. एआय, मशीन लर्निंग आणि पूर्वानुमानात्मक विश्लेषणाच्या मदतीने मुंबईची मलनिःस्सारण व्यवस्था अधिक तत्पर, कार्यक्षम आणि विश्वासार्ह करण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे, असे डॉ. शर्मा यांनी सांगितले.यावेळी प्रमुख अभियंता (मलनिःस्सारण प्रचालन) प्रचिती देसाई यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.