नारी नेहमी लई भारी’चा रंगतदार सोहळा; गृहिणींना मिळाले प्रतिभा सादर करण्याचे व्यासपीठ
किरण इव्हेंट्सच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; विशेष मुलांच्या सादरीकरणाने जिंकली प्रेक्षकांची मने

प्रतिनिधी | मुंबई
महिलांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किरण इव्हेंट्स (हाऊस ऑफ म्युझिक) आयोजित ‘नारी नेहमी लई भारी’ या चौथ्या पर्वाचा रंगतदार सोहळा सायन येथील सरस्वती ऑडिटोरियम (गोकुळ हॉल) येथे उत्साहात पार पडला. किरण गौर यांच्या संकल्पनेतून आणि संतोष गावणकर यांच्या सहकार्याने सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना रेनिता पवारे यांच्या मनमोहक नृत्याविष्काराने झाली. गृहिणींमधील सुप्त कला आणि आत्मविश्वासाला नवे व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते ‘आवाहन पालक’ संस्थेतील विशेष मुलांचे नृत्य आणि गायन सादरीकरण. त्यांच्या भावस्पर्शी कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकत सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
यावेळी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले. गायन स्पर्धेत प्रशांत नारायणकर आणि शिल्पा चव्हारकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर पारंपरिक फॅशन शोमध्ये जयु गायकवाड यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
कार्यक्रमाला बॉलिवूड आणि सॅंडलवूड अभिनेते कमल घिमिरे तसेच आंतरराष्ट्रीय गायिका आणि कुमार सानू यांच्या सहगायिका रचना चोप्रा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. त्यांच्या दमदार सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कार्यक्रमाचे संगीत संयोजन कैलाश महौर यांनी केले, तर कार्यक्रमासाठी आवश्यक आकर्षक क्रिएटिव्ह डिझाइनची जबाबदारी लावण्या तोडणकरी यांनी यशस्वीपणे सांभाळली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई सचिव दीप्ती शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी किरण गौर, संतोष गावणकर तसेच सर्व कलाकार, मान्यवर आणि आयोजकांचे विशेष कौतुक केले.
महिलांना सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच विशेष मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले. “नारी नेहमी लई भारी” हा उपक्रम केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उत्सव ठरला.