पालिका मुख्यालयातील उपहारगृहात आरोग्याशी खेळ!
ताकाच्या ग्लासात माशी, कांदा भजीत प्लास्टिकचा तुकडा; हजारो अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जीवाशी बेफिकिरी

विशेष प्रतिनिधी | मुंबई
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहात अन्नसुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आला असून, कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे हजारो अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणि नागरिकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ३ जुलै रोजी ताकाच्या ग्लासात चक्क माशी, तर कांदा भजीमध्ये प्लास्टिकचा तुकडा आढळल्याने उपहारगृहाच्या स्वच्छता आणि अन्नगुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिका मुख्यालयातील उपहारगृहाचे संचालन कमल कॅटरर्स प्रा. लि. या कंपनीकडे आहे. मुख्यालयात दररोज पाच हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी कार्यरत असतात. याशिवाय आझाद मैदान परिसरातील पोलीस, विविध विभागांमध्ये येणारे नागरिक आणि अभ्यागतही मोठ्या संख्येने याच उपहारगृहाचा वापर करतात. त्यामुळे दररोज हजारो जण येथे नाश्ता आणि जेवण करतात.

मात्र, उपहारगृहात खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवणे, परिसरातील अस्वच्छता आणि अन्न हाताळणीतील हलगर्जीपणा यामुळे अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ताकात माशी आणि भजीत प्लास्टिकचा तुकडा सापडल्याच्या घटनेने कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाचे गंभीर स्वरूप समोर आले आहे.
या प्रकाराबाबत विचारणा करण्यात असता कमल कॅटरर्सच्या व्यवस्थापकांनी चूक झाल्याची अप्रत्यक्ष कबुली देत, “अशी घटना पुन्हा घडणार नाही,” एवढेच सांगितले. मात्र, हजारो कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रकारावर महापालिका प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.