मुंबई आता ‘पादचारी प्रथम’! २४६ किमी पदपथ झाले अडथळामुक्त १७११ ठिकाणी अतिक्रमणावर कारवाई
मुंबईला ‘पायी चालण्यासाठी देशातील सर्वोत्तम महानगर’ बनविण्याचा महापालिकेचा निर्धार

मुंबई | प्रतिनिधी :
मुंबईची ओळख केवळ वेगवान वाहतुकीचे महानगर म्हणून नव्हे, तर पायी चालणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी सुरक्षित, सुटसुटीत आणि अडथळामुक्त शहर अशी निर्माण करण्याच्या दिशेने बृहन्मुंबई महानगरपालिकेने पावले उचलली आहेत. ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत सुमारे २४६ किलोमीटर पदपथ अडथळामुक्त करण्यात आले असून, तब्बल १७११ ठिकाणी अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. मुंबईला पायी फिरण्यासाठी सर्वोत्तम महानगर बनविण्याचा निर्धार गुरुवारी झालेल्या तज्ज्ञ आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला.
माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमणे आणि पादचाऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करून नागरिकांना सुरक्षितपणे चालता यावे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
या अभियानाच्या पुढील अंमलबजावणीसाठी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्षात गुरुवारी (३ सप्टेंबर) तज्ज्ञ अभ्यासक, नगररचनाकार, वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चर्चासत्र झाले. ‘पदपथ हे वाहनांसाठी नव्हे, तर नागरिकांसाठी आहेत’, हा या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.
‘पदपथ चांगले असतील तर नागरिक चालतील’
महापालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी चर्चासत्राचे प्रास्ताविक केले. ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविताना अधिकाऱ्यांसमोर येणाऱ्या कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणी, त्यावर उपाययोजना आणि कायदेशीर सल्ल्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांना चालण्यासाठी चांगली व्यवस्था उपलब्ध करून दिली, तर ते नक्कीच पायी चालतील. त्यामुळे सुयोग्य, सुरक्षित आणि सर्वांसाठी सहज वापरता येतील असे पदपथ निर्माण करणे आवश्यक आहे, असे डॉ. ढाकणे यांनी स्पष्ट केले.
५० टक्के मुंबईकर पायी; तरी ८२ टक्के रस्ता खासगी वाहनांच्या ताब्यात
‘अर्बन वर्क्स इन्स्टिट्यूट’च्या संस्थापक श्रेया गाडेपल्ली यांनी विविध शहरांतील पदपथांची रचना आणि धोरणांचे सादरीकरण केले. मुंबईतील वाहतुकीचे वास्तव मांडताना त्यांनी सांगितले की, मुंबईतील सुमारे ५० टक्के नागरिक दररोज पायी प्रवास करतात, ३० टक्के नागरिक सार्वजनिक वाहतूक वापरतात, तर केवळ २० टक्के नागरिक खासगी वाहनांनी प्रवास करतात.
मात्र, रस्त्याच्या उपलब्ध जागेपैकी तब्बल ८२ टक्के जागा खासगी वाहनांकडून वापरली जाते, तर त्यातून केवळ १९ टक्के नागरिक प्रवास करतात. याउलट उर्वरित जागेत तब्बल ८१ टक्के नागरिकांचा प्रवास होतो. त्यामुळे शहराच्या रचनेत पादचाऱ्यांना अधिक प्राधान्य देणे ही केवळ गरज नाही, तर महापालिकेची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘पक्षी हवेत, मासा पाण्यात; माणूस जमिनीवर चालतो’
पदपथांचे महत्त्व स्पष्ट करताना श्रेया गाडेपल्ली यांनी ‘जसा पक्षी हवेत विहार करतो, मासा पाण्यात पोहतो, तसाच माणूस जमिनीवर चालतो’, असे सांगत शहराच्या नियोजनात पादचाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्याची गरज अधोरेखित केली. पदपथ कसा असावा, त्यावर कोणते अडथळे नसावेत आणि नागरिकांसाठी तो अधिक सुरक्षित व सुलभ कसा करता येईल, याचे प्रात्यक्षिकही त्यांनी दिले.
‘मुंबईत पदपथ सुधारणा शक्य; टप्प्याटप्प्याने काम करा’
माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी ‘पादचारी प्रथम’ अभियानाची संकल्पना महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. अभियान कसे राबवायचे, अधिकाऱ्यांची भूमिका काय असावी आणि अडचणींचे निराकरण कसे करायचे, याबाबत सर्व अधिकारी-अभियंत्यांना स्पष्ट माहिती असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानाबाबत लवकरच माहिती पुस्तिका तयार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. अभियानाच्या अंमलबजावणीत सहाय्यक आयुक्तांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
झाडेही पादचाऱ्यांचा मार्ग अडवणार नाहीत
पदपथांच्या बाजूला वृक्षलागवड करताना मोठ्या आकाराची झाडे लावण्याऐवजी स्थानिक प्रजातींची आणि तुलनेने कमी उंचीची झाडे निवडावीत, अशी सूचना डॉ. ढाकणे यांनी केली. पदपथावर झाडे, दिशादर्शक, रॅम्प किंवा अन्य सुविधांची उभारणी करताना पादचाऱ्यांच्या चालण्याच्या जागेवर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज चर्चेत अधोरेखित झाली.
न्यूयॉर्क, हाँगकाँगच्या धर्तीवर पादचारी सुविधा
नगररचनाकार पंकज जोशी यांनी न्यूयॉर्क आणि हाँगकाँगमधील सिग्नल व्यवस्था व पादचारी सुविधांची माहिती दिली. दक्षिण मुंबईतील पदपथांची दगडी बांधणी, दिशादर्शकांची योग्य जागा, झाडांभोवतीच्या कुंपणाची उंची यासह विविध तांत्रिक बाबींवर त्यांनी मार्गदर्शन केले.
‘वॉकिंग प्रोजेक्ट’चे संस्थापक व निमंत्रक रिषी अग्रवाल यांनी मुंबईतील विविध पदपथांचे उदाहरण देत वाहतूक बेटे, वृक्षांच्या बुंध्याभोवतीची माती, तसेच गृहनिर्माण संस्थांनी उभारायचे रॅम्प याबाबत मार्गदर्शन केले.
‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’चे संचालक रमणा राचाप्रोलू यांनी मेट्रो प्रकल्पांच्या उभारणीत पादचारी सुविधांचा समावेश करण्यासाठी राबविण्यात आलेल्या धोरणांची माहिती दिली.
अतिक्रमण हटविले, आता पुन्हा होऊ न देण्याचे आव्हान
‘पादचारी प्रथम’ अभियान केवळ अतिक्रमण हटविण्यापुरते मर्यादित न ठेवता मोकळे झालेले पदपथ पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात जाणार नाहीत, यासाठी सातत्याने देखरेख करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली. प्रत्येक अभियंत्याने आपल्या विभागातील पदपथांवर प्रत्यक्ष पायी चालत पाहणी करावी आणि अडचणीच्या ठिकाणी कायदेशीर सल्ला घेऊन मार्ग काढावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.
२६ही प्रशासकीय विभागांत अभियान
‘पादचारी प्रथम’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात २०० पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी १३६ पदपथांवरील काम हाती घेण्यात आले असून सुमारे २४६ किलोमीटर पदपथ अडथळामुक्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत १७११ ठिकाणी कारवाई करण्यात आली असून महापालिकेच्या सर्व २६ प्रशासकीय विभागांमध्ये अभियान राबविण्यात येत आहे.
‘मोकळे पदपथ नागरिकांपर्यंत पोहोचवा’
महापालिका, पोलिस आणि अन्य संबंधित प्राधिकरणांनी परस्पर समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सहाय्यक आयुक्त आणि उपआयुक्तांनी दर महिन्याला अभियानाचा आढावा घ्यावा, अशा सूचनाही करण्यात आल्या.
दरम्यान, अतिक्रमणमुक्त करण्यात आलेल्या पदपथांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून ‘मोकळ्या पदपथांचा आनंद घ्या, मुंबई पायी अनुभवा’, यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन चर्चासत्रातून करण्यात आले.
मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांना नव्हे, तर नागरिकांच्या पावलांना अधिक जागा मिळावी, हा ‘पादचारी प्रथम’ अभियानाचा गाभा असून, त्यातून मुंबईच्या रस्त्यांचे चित्र बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.