गणेशोत्सवासाठी आता स्वस्तात एसटी आरक्षित करा
३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द; हजारो गणेशभक्तांना मोठा दिलासा
प्रतिनिधी/मुंबई,
: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो गणेशभक्तांना मोठा दिलासा देणारा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. संपूर्ण एसटी बस आरक्षित करण्यासाठी आकारले जाणारे ३० टक्के अतिरिक्त शुल्क यंदा रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघरमधून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांना आता तुलनेने कमी खर्चात एसटी बसचे गट आरक्षण करता येणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी दिली. एकेरी गट आरक्षणावर (ग्रुप बुकिंग) यापुढे ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. या निर्णयाचे अधिकृत परिपत्रक एसटी महामंडळाकडून लवकरच जारी करण्यात येणार असल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
कोकणवासीयांच्या मागणीला प्रतिसाद
गणेशोत्सव आणि एसटी महामंडळाचे कोकणवासीयांशी गेल्या अनेक दशकांपासून अतूट नाते आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातून दरवर्षी हजारो चाकरमानी एसटीने गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जातात. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सुमारे ५ हजार एसटी बसेसचे आरक्षण केले जाते.
मात्र, या बसेस प्रवाशांना कोकणात सोडल्यानंतर रिकाम्या परत आणाव्या लागतात. त्यामुळे एसटी महामंडळावर इंधन, चालक-वाहकांचे अतिरिक्त काम तसेच इतर खर्चाचा मोठा भार पडतो. डिझेलच्या वाढलेल्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या अतिकालीन भत्त्यात झालेली वाढ लक्षात घेऊन एसटीने ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, या शुल्कामुळे गणेशभक्तांवर आर्थिक भार पडत असल्याने कोकणवासीय आणि विविध गणेशोत्सव मंडळांनी ते रद्द करण्याची मागणी केली होती. याबाबतची निवेदने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही सादर करण्यात आली होती. कोकणवासीयांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून शिंदे यांनी अतिरिक्त शुल्क रद्द करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार यंदाच्या गणेशोत्सवासाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
एसटीवरील आर्थिक भार कसा भरून काढणार?
३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द केल्यामुळे एसटी महामंडळाला मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. त्यामुळे निर्माण होणारा अतिरिक्त आर्थिक भार इतर मार्गांवरील प्रवासी वाहतूक वाढवून भरून काढण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.
या निर्णयामुळे गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आता एसटीचा प्रवासही अधिक परवडणारा होणार आहे.