मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा बट्ट्याबोळ; संत मुक्ताबाई रुग्णालयात उपचाराअभावी रुग्ण बेहाल!
डेंग्यूग्रस्ताला ‘बेड नाही’ सांगून उपचार नाकारल्याचा आरोप; ॲड. अमोल मातेले यांचा प्रशासनावर हल्लाबोल — ६ तासांच्या प्रतीक्षेपासून मनुष्यबळाच्या तुटवड्यापर्यंत गंभीर प्रश्न

मुंबई, प्रतिनिधी २२ ऑगस्ट २०२६ :
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील आरोग्य व्यवस्थेचा कारभार दिवसेंदिवस ढासळत असून, त्याचा थेट फटका गोरगरीब रुग्णांना बसत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे. घाटकोपर पश्चिम येथील संत मुक्ताबाई रुग्णालयात डेंग्यूने गंभीर आजारी असलेल्या रुग्णाला १७ ऑगस्ट रोजी ‘बेड उपलब्ध नाही’ असे सांगून उपचार नाकारण्यात आल्याचा आरोप करत मातेले यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे.
या घटनेनंतर ॲड. अमोल मातेले यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांची भेट घेऊन रुग्णाला उपचार नाकारण्यामागील कारणांचा जाब विचारला. पाहणीदरम्यान रुग्णालयातील मनुष्यबळाचा तुटवडा, रुग्णांच्या लांबच लांब रांगा, औषध वितरणातील विलंब आणि हाऊसकीपिंग व्यवस्थेतील कथित अनियमितता यांसारखे गंभीर प्रश्न समोर आल्याचा दावा त्यांनी केला.
उपचारासाठी रुग्णांना सहा तासांचा ‘वनवास’
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सामान्य रुग्णाला आधी केस पेपरसाठी दोन तास, डॉक्टरांच्या तपासणीसाठी दोन तास आणि औषधांसाठी आणखी दोन तास, अशी तब्बल सहा तासांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप मातेले यांनी केला. गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाला उपचाराऐवजी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असेल, तर ही आरोग्यसेवा नसून रुग्णांच्या जिवाशी खेळ असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.अर्ध्याहून अधिक पदे रिक्त; रुग्णालय चालणार तरी कसे?
रुग्णालयातील मंजूर आणि प्रत्यक्ष कार्यरत मनुष्यबळाच्या आकडेवारीवरूनही परिस्थिती चिंताजनक असल्याचे मातेले यांनी म्हटले आहे.
डॉक्टर: ७० मंजूर पदांपैकी केवळ ४४ पदे भरलेली; २६ पदे रिक्त
निम्न वैद्यकीय कर्मचारी: ४२ मंजूर पदांपैकी १९ कार्यरत; २३ पदे रिक्त
परिचारिका: ७१ मंजूर पदांपैकी ६५ कार्यरत; ६ पदे रिक्त
कामगार वर्ग: ८० मंजूर पदांपैकी ४८ कार्यरत; ३२ पदे रिक्त
एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नसेल, तर रुग्णालयातील आरोग्यसेवा कोलमडणार नाही तर काय, असा सवाल मातेले यांनी उपस्थित केला.
हाऊसकीपिंग कंत्राटावरही गंभीर आरोप
रुग्णालयातील हाऊसकीपिंग व्यवस्थेबाबतही त्यांनी गंभीर आरोप केले. संबंधित कंत्राटदाराकडून करारानुसार आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच उपलब्ध कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसून, PF आणि ESIC सारख्या सामाजिक सुरक्षा सुविधांपासूनही त्यांना वंचित ठेवले जात असल्याचा आरोप मातेले यांनी केला.

कंत्राटी कामगारांचे कथित शोषण आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णालयाची स्वच्छता व्यवस्था प्रभावित होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
‘बेड नाही’ सांगण्याआधी रुग्णाला प्राथमिक उपचार मिळणार का?
डेंग्यूसारख्या गंभीर आजारात रुग्णाला वेळेत प्राथमिक उपचार आणि आवश्यक वैद्यकीय स्थिरीकरण देणे गरजेचे असताना, केवळ बेड उपलब्ध नसल्याच्या कारणावरून रुग्णाला परत पाठवणे योग्य आहे का, असा थेट सवाल मातेले यांनी प्रशासनाला केला.
“पालिका रुग्णालये ही गरीब आणि गरजू नागरिकांसाठी शेवटची आशा आहेत. मात्र, मुक्ताबाई रुग्णालयात रुग्णांना उपचार मिळण्याऐवजी दारातून परतावे लागत असेल, तर महापालिका प्रशासनाच्या आरोग्य व्यवस्थेचे अपयश स्पष्ट होते,” असा हल्लाबोल त्यांनी केला.
मातेले यांच्या प्रमुख मागण्या
१७ ऑगस्टच्या ‘बेड नाकारल्याच्या’ घटनेची सखोल चौकशी करून दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
डॉक्टर, पॅरामेडिकल तसेच वर्ग-४ कर्मचाऱ्यांची सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत.
केस पेपर, ओपीडी आणि औषध वितरणासाठी अतिरिक्त खिडक्या सुरू करून रुग्णांचा प्रतीक्षाकाळ कमी करावा.
उपलब्ध आणि रिक्त बेडची माहिती दर्शविणारा डिजिटल डिस्प्ले बोर्ड तातडीने बसवावा.
हाऊसकीपिंग कंत्राटाची चौकशी करून करारातील अटींची पूर्तता होत आहे की नाही, याची तपासणी करावी.
कामगारांचे थकीत वेतन तसेच PF आणि ESIC सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात.
“महापालिका प्रशासनाने आरोग्य व्यवस्थेतील या त्रुटी तातडीने दूर केल्या नाहीत, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या आरोग्य विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही ॲड. अमोल मातेले यांनी दिला.
या पाहणी दौऱ्यावेळी अक्षय खिल्लारी, कार्तिक घोंगे, किरणभाऊ मुके, सत्यवानदादा दळवी, निशांत जाधव, गणेश हाडवळे, श्री. शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.