मुंबईला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनविण्याचा पालिकेचा निर्धार!
पर्यटकांसाठी स्वच्छता, सुरक्षितता, डिजिटल माहिती प्रणालीसह सर्वसमावेशक सुविधा; आयुक्त अश्विनी भिडे यांची घोषणा

मुंबई | प्रतिनिधी
देश-विदेशातील पर्यटकांसाठी मुंबईचा अनुभव अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आता व्यापक स्तरावर पावले उचलणार आहे. पर्यटनस्थळांवर स्वच्छता, सुशोभीकरण, मार्गदर्शक फलक, सार्वजनिक स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, डिजिटल माहिती प्रणाली आणि पर्यटकांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर पालिकेचा विशेष भर असल्याची घोषणा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केली.
महापालिका मुख्यालयात शुक्रवारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त बैठकीत त्या बोलत होत्या. मुंबईची पर्यटन क्षमता अधिक वृद्धिंगत करून नागरिकांसह देश-विदेशातील पर्यटकांना जागतिक दर्जाचा अनुभव देणे हेच पालिकेचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आयुक्त भिडे म्हणाल्या की, मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नसून ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वारसास्थळांनी समृद्ध अशी पर्यटननगरी आहे. या वारशाचे प्रभावी सादरीकरण करण्यासाठी विविध पर्यटनस्थळांवर मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावला जाईल. पर्यटकांना अचूक आणि विश्वासार्ह माहिती मिळावी यासाठी समर्पित डिजिटल माहिती प्रणाली आणि स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्याची सूचनाही त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला केली.
त्यांनी सांगितले की, मुंबईकरांना मूलभूत नागरी सुविधा देणे हे पालिकेचे पहिले कर्तव्य असले तरी पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठीही महानगरपालिका तितक्याच प्रभावीपणे काम करत आहे. पर्यटनाला चालना मिळाल्यास शहराच्या अर्थव्यवस्थेला, रोजगाराला आणि स्थानिक व्यवसायांनाही मोठा फायदा होईल.
बैठकीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल यांनी राज्यातील पर्यटन विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचे सादरीकरण केले. पर्यटन पायाभूत सुविधा मजबूत करणे, शाश्वत पर्यटनाला चालना देणे तसेच इको-टुरिझम आणि साहसी पर्यटनाचा विस्तार करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेने सकारात्मक सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या बैठकीला मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, पालिकेचे उपायुक्त प्रशांत गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी संजयकुमार शिंदे, व्यवसाय विकास विभागाच्या प्रमुख मानसी कोठारे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबईला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक प्रभावी स्थान मिळवून देण्यासाठी महापालिका, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून व्यापक कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.