जीएमएलआर प्रकल्पाला मोठा वेग; मुंबईतील सर्वात मोठ्या जुळ्या बोगद्याच्या खोदकामाची उलटी गणना सुरू
३० जुलैला पहिल्या TBM ची जुळणी पूर्ण; तांत्रिक चाचण्या यशस्वी, २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य

मुंबई | प्रतिनिधी
मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आता सुरू होत असून, दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येणाऱ्या जुळ्या बोगद्यांच्या खोदकामासाठी पहिल्या टनेल बोरिंग मशीन (TBM) ची जुळणी गुरुवार (३० जुलै) रोजी पूर्ण होणार आहे. यामुळे प्रत्यक्ष बोगदा खोदकामाचा मार्ग मोकळा होणार आहे.
या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी बुधवारी प्रकल्पस्थळी भेट देऊन कामाचा आढावा घेतला आणि कामात वेग व गुणवत्ता कायम ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, TBM ची संपूर्ण यंत्रणा प्रकल्पस्थळी उभारल्यानंतर साइट अॅक्सेप्टन्स टेस्ट (SAT) यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहे. या चाचण्यांमध्ये यांत्रिक, विद्युत, हायड्रॉलिक, नियंत्रण आणि सुरक्षा प्रणालींची सखोल तपासणी करण्यात आली असून सर्व प्रणाली निर्धारित निकषांनुसार सक्षम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकल्पाअंतर्गत गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीपासून मुलुंडच्या खिंडीपाड्यापर्यंत प्रत्येकी ४.७० किलोमीटर लांबीचे दोन समांतर भूमिगत बोगदे उभारले जाणार आहेत. या बोगद्यांचा व्यास १४.२० मीटर असून, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात तो १३ मीटर असेल. हा मुंबईतील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे.
बोगदा खोदकामासाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक सिंगल शिल्ड अर्थ प्रेशर बॅलन्स (EPB) हार्ड रॉक TBM हे ८३ मीटर लांबीचे असून त्याच्या कटरचा व्यास १४.४९ मीटर आहे. यामध्ये २२ मीटरचा शिल्ड विभाग आणि ६१ मीटर लांबीची तीन मजली बॅकअप गॅन्ट्री समाविष्ट आहे.
या यंत्रात पूर्णपणे स्वयंचलित मलबा हाताळणी प्रणाली बसविण्यात आली असून ३४० मीटर लांबीची कन्व्हेयर व्यवस्था, क्रॉस कन्व्हेयर आणि स्टॅकर कन्व्हेयरमुळे खोदकामातून बाहेर पडणाऱ्या मलब्याची जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतूक शक्य होणार आहे. त्यामुळे कठीण भूगर्भीय परिस्थितीतही बोगद्याचे काम अधिक वेगाने पूर्ण करण्यास मदत होणार आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उर्वरित तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष बोगदा खोदकामाला सुरुवात होईल. फेब्रुवारी २०२९ पर्यंत संपूर्ण GMLR प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
पाहणीवेळी प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता नरेश मेघराजानी तसेच प्रकल्पाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते.