महापौर बंगल्यात उमटला कृतज्ञतेच्या राखीचा भावबंध
महापौर रितू तावडे व आमदार चित्राताई वाघ यांनी कर्मचाऱ्यांना राखी बांधून केले औक्षण

प्रतिनिधी/मुंबई, :
रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नव्हे, तर प्रेम, विश्वास, जिव्हाळा आणि संरक्षणाच्या भावनेला घट्ट करणारा स्नेहबंध आहे. याच भावनेला सामाजिक कृतज्ञतेची जोड देत भायखळा येथील महापौर निवासस्थानी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी महापौर बंगल्यात दिवस-रात्र सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधनाचा सण कौटुंबिक वातावरणात साजरा केला. यावेळी आमदार श्रीमती चित्राताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
महापौर रितू तावडे आणि आमदार चित्राताई वाघ यांनी कर्मचाऱ्यांना स्वतः राखी बांधून त्यांचे औक्षण केले. तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, सुख-समृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सण-उत्सव असो अथवा आव्हानात्मक परिस्थिती, महापौर निवासस्थानी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना महापौर रितू तावडे म्हणाल्या, “रक्षाबंधनाचा धागा हा केवळ रक्ताच्या नात्यांना जोडणारा नाही, तर प्रेम, विश्वास, काळजी आणि संरक्षणाची भावना जपणारा आहे. दिवस-रात्र निःस्वार्थपणे सेवा देणारे महापौर बंगल्यातील सर्व कर्मचारी हे आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही छोटीशी संधी आहे.”

महापौरांच्या हस्ते राखी बांधण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्येही आनंदाचे आणि आपलेपणाचे वातावरण निर्माण झाले. पद, जबाबदारी आणि औपचारिकतेच्या पलीकडे जाऊन ‘सेवा करणाऱ्यांप्रती कृतज्ञता’ व्यक्त करणारा हा रक्षाबंधन सोहळा उपस्थितांसाठी भावनिक आणि संस्मरणीय ठरला.
राखीच्या धाग्याने नाते जोडले; कृतज्ञतेच्या भावनेने ते अधिक घट्ट केले, असा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.