सिग्नलवरून शाळेकडे… मुख्य प्रवाहात शिक्षणाची वाट!
चेंबूरच्या 'सिग्नल स्कूल'ला अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांची भेट

मुंबई, प्रतिनिधी : वाहतूक सिग्नलवर भटकणाऱ्या, बेघर आणि स्थलांतरित मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश आणणाऱ्या चेंबूरमधील ‘सिग्नल स्कूल’ला शनिवारी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी भेट देत विविध शैक्षणिक व कौशल्य विकास उपक्रमांचा आढावा घेतला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसोबत दिंडीत सहभागी होत त्यांनी पालखीला खांदा लावला आणि मुलांचा उत्साह वाढवला.
सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड उड्डाणपुलाखाली अमर महाल परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अर्थसहाय्याने आणि समर्थ भारत व्यासपीठाच्या माध्यमातून ही सिग्नल शाळा चालवली जाते. बालवाडीपासून ते इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना येथे शिक्षणासह संस्कार, कौशल्य आणि आत्मविश्वासाची शिकवण दिली जाते.
भेटीदरम्यान प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शिक्षणातील प्रगतीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, ब्युटी अँड वेलनेस प्रशिक्षण, परिचारिका प्रशिक्षण, पाककला विभाग आणि अत्याधुनिक रोबोटिक्स लॅब यांची पाहणी केली. शिक्षणासोबतच रोजगाराभिमुख कौशल्ये विकसित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
ही शाळा केवळ अक्षरओळख करून देणारी नसून समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या मुलांना सुरक्षित, आनंदी आणि शिस्तबद्ध वातावरण देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. मुलांमध्ये स्वच्छता, आरोग्य, चांगल्या सवयी, शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी दिवसभर विविध शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि कौशल्यविकासाचे उपक्रम राबविले जातात.
दररोज सुमारे ११ तास मुलांना सुरक्षित वातावरणात ठेवून त्यांना शिक्षणाची गोडी लावण्याबरोबरच पुढे महानगरपालिकेच्या नियमित शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार केले जाते. त्यामुळे ‘सिग्नल स्कूल’ ही मुख्य शिक्षणप्रवाहात जाण्यासाठी महत्त्वाची संक्रमण शाळा ठरत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात पारंपरिक दिंडी काढली. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी विद्यार्थ्यांसोबत दिंडीत सहभागी होत पालखीला खांदा दिला. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात साजऱ्या झालेल्या या सोहळ्याने शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नवीन स्कूल बसचे लोकार्पणही करण्यात आले. या बसमुळे शाळेत येणाऱ्या मुलांना सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या प्रसंगी उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, उपआयुक्त (परिमंडळ-५) संध्या नांदेडकर, एम-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त शंकर भोसले, समर्थ भारत व्यासपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.