जन्मदाखल्यांसाठी महापालिकेचा मोठा दिलासा;
अर्ज स्वीकारण्याची वेळ वाढली, रविवारीही नागरी सुविधा केंद्र सुरू राहणार

मुंबई, प्रतिनिधी : जन्मदाखल्यासाठी नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. मानखुर्द, शिवाजीनगर, कुर्ला, चेंबूरसह परिमंडळ-५ मधील प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिले. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी नागरी सुविधा केंद्रांमध्ये अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाढविण्याचा आणि गरजेनुसार रविवारीही केंद्र सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
चेंबूर येथील एम-पश्चिम विभाग कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत परिमंडळ-५ अंतर्गत एम-पूर्व, एम-पश्चिम आणि एल विभागातील जन्मदाखला अर्जांच्या प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, उपायुक्त (परिमंडळ-५) संध्या नांदेडकर, संबंधित विभागांचे सहायक आयुक्त आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत वर्मा-लवंगारे यांनी स्पष्ट निर्देश देत सांगितले की, जन्मदाखल्याशी संबंधित प्रत्येक अर्ज शक्य तितक्या कमी कालावधीत निकाली काढला गेला पाहिजे. त्यासाठी प्रशासकीय स्तरावर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून अर्जांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी.
जन्मदाखला प्रक्रियेसाठी डिजिटल प्रणाली
जन्मदाखल्यातील दुरुस्ती, नवीन अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी यासाठी महापालिका स्वतंत्र ऑनलाइन सॉफ्टवेअर आणि डॅशबोर्ड विकसित करणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज ऑनलाइन स्वीकारणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, प्रत्येक अर्जाची स्थिती पाहणे आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणणे शक्य होणार आहे.
विद्यार्थी आणि परदेशगमनासाठीचे अर्ज प्राधान्याने
शैक्षणिक प्रवेश, परदेशी शिक्षण तसेच व्हिसा प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या क्यूआर कोडयुक्त जन्मदाखल्यांच्या अर्जांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देशही अतिरिक्त आयुक्तांनी दिले. अशा अर्जांना प्राधान्य देऊन विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यावर भर देण्यात आला.
आरोग्य विभागाच्या कामकाजाचाही आढावा
बैठकीत खासगी-सार्वजनिक भागीदारीतील आरोग्य प्रकल्प, पावसाळी आजारांची स्थिती, प्रसूतिगृहे, उपनगरीय रुग्णालयांची क्षमता वाढ, दुरुस्तीची कामे तसेच लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय (शीव), गोवंडी शताब्दी रुग्णालय आणि माँ रुग्णालय (चेंबूर) यांच्या कामगिरीचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.
प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी विभागप्रमुख आणि सहायक आयुक्तांना नियमित स्थळभेटी घेऊन आरोग्य यंत्रणेचे काम अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याचे निर्देश दिले. जन्मदाखल्यांच्या प्रलंबित अर्जांचा वेगाने निपटारा करण्यासाठी महापालिकेने उचललेल्या या पावलामुळे हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.