धारावी पुनर्विकासासाठी ८७१ झाडांवर कुऱ्हाड; ८२२ झाडांचे पुनर्रोपण, २४ वारसा वृक्षही तोडणार वृक्ष प्राधिकरणाची मोठी मंजुरी
पवई एसआरएमधून महापालिकेला ४ हजार पीएपी घरे, प्रत्येक वॉर्डात 'मॅक लिफ्टन' मशीन देण्याची घोषणा
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील महत्त्वाकांक्षी धारावी पुनर्विकास प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाला असून, या प्रकल्पासाठी अडथळा ठरणाऱ्या १,६९३ झाडांपैकी ८७१ झाडे तोडण्यास आणि ८२२ झाडांचे पुनर्रोपण करण्यास मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मंगळवारी मंजुरी दिली. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत २४ वारसा (हेरिटेज) वृक्षही तोडण्यास, तर एका वारसा वृक्षाचे स्थलांतर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत धारावीसह मरीन लाईन्स–ऑरेंज गेट बोगदा, पवई हिरानंदानी एसआरए, कांदिवली पोईसर आणि घाटकोपर-किरोळ एसआरए या महत्त्वाच्या विकास प्रकल्पांतील एकूण २,७१० झाडांच्या तोड व पुनर्रोपणाला मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, पवई येथील हिरानंदानी एसआरए प्रकल्पातून महापालिकेला प्रकल्पग्रस्तांच्या (पीएपी) पुनर्वसनासाठी तब्बल ४ हजार घरे उपलब्ध करून देण्यास विकासकाने सहमती दर्शविली, त्यामुळे भविष्यातील विकास प्रकल्पांतील पुनर्वसनाचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
भाजपचे सभागृह नेते व वृक्ष प्राधिकरण सदस्य गणेश खणकर यांनी तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या त्याच प्रजातीची झाडे पुन्हा लावावीत, अशी सूचना केली. त्यानुसार मंजुरीनंतर १५ दिवसांच्या आत किमान सहा फूट उंचीची देशी प्रजातीची रोपे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे वृक्षारोपण पालघर जिल्ह्यातील चहाडे गावातील ९० एकर जागेवर करण्यात येणार असून, त्याची प्रत्यक्ष पाहणी वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य करणार आहेत.
झाडांच्या देखभालीसाठीही महत्त्वाचा निर्णय घेत महापालिकेच्या सर्व २६ वॉर्डांमध्ये ‘मॅक लिफ्टन’ मशीन उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे झाडांची छाटणी अधिक सुरक्षित आणि शास्त्रोक्त पद्धतीने करता येणार आहे.
बैठकीत वृक्ष समितीमध्ये वृक्षतज्ज्ञांसोबत एक युवा प्रतिनिधी आणि एका महिला सदस्याचा समावेश करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. तसेच, मुंबईतील वाढत्या मेट्रो जाळ्यामुळे पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी मेट्रो मार्गांच्या खाली बांबूची लागवड करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला.