प्रतिनिधी/मुंबई
: मुंबईकरांच्या पादचारी हक्कासाठी महापालिकेने राबविलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाला आता धडक कारवाईची जोड मिळाली आहे. दादर आणि सांताक्रूझ परिसरातील पदपथांवर अडथळा ठरणाऱ्या १५ अनधिकृत दुकानांसह १५ फेरीवाल्यांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईत शेड, कट्टे आणि एका फूड व्हॅनवरही निष्कासनाची कारवाई करण्यात आली असून सांताक्रूझमध्ये तब्बल ५०० मीटरचा पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळा झाला आहे.
दादरमध्ये दुकाने, शेड आणि कट्ट्यांवर कारवाई
‘एफ दक्षिण’ विभागाने दादर (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गालगतच्या पदपथावर कारवाई केली. येथे ४ अनधिकृत दुकाने, १२ तात्पुरते ताडपत्रीचे शेड, ६ अनधिकृत कट्टे आणि १५ फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. त्यामुळे या भागातील पदपथावरील अडथळे दूर करण्यास सुरुवात झाली आहे.
सांताक्रूझमध्ये ११ दुकानांवर कारवाई
‘एच पूर्व’ विभागाने सांताक्रूझ (पूर्व) येथील टीपीएस-३ परिसरातील मार्ग क्रमांक ६, ७ आणि ११ येथे ६ अनधिकृत दुकाने हटविली. तसेच नानासाहेब धर्माधिकारी मार्गालगतच्या पदपथांवरील आणखी ५ अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये एका फूड व्हॅनचाही समावेश आहे. या कारवाईमुळे सुमारे ५०० मीटरचा पदपथ मोकळा झाला असून पादचाऱ्यांसाठी चालण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर मोहीम तीव्र
पदपथांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ येऊ नये, यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार महापालिकेने ही मोहीम तीव्र केली आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्या नेतृत्वाखाली ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे.
उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (एफ दक्षिण) वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वात दादरमध्ये, तर उपायुक्त (परिमंडळ-३) विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (एच पूर्व) मृदुला अंडे यांच्या नेतृत्वात सांताक्रूझमध्ये कारवाई करण्यात आली.
पदपथ अडविल्यास कारवाईचा इशारा
महापालिकेने पदपथ पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त ठेवण्याचे स्पष्ट केले आहे. पदपथावर अनधिकृत बांधकाम करणे, दुकाने थाटणे अथवा कोणतेही साहित्य ठेवून पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.