Breaking
ब्रेकिंग

नाल्‍यात कचरा टाकणा-याविरोधात  महानगरपालिकेकडून पोलिस तक्रार

गाळ काढलेल्या नाल्यांमध्ये  कचरा टाकू नका ;  महानगरपालिकेचे  आवाहन

0 0 2 1 1 8

प्रतिनिधी, मुंबई

१७ जून २०२५_

मुंबईतील अनेक भागातील नाले नियमितपणे स्वच्छ केल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांमध्ये औद्योगिक कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारामुळे नाले तुंबण्याचा धोका निर्माण होत असून, परिणामी शहरात पाणी साचण्याची समस्या वाढत आहे. धारावी येथील टी जंक्‍शन नाला स्‍वच्‍छ केल्‍यावर त्‍यात औद्योगिक कचरा मोठ्या प्रमाणावर टाकल्‍याचे आढळून आले आहे. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने भारतीय न्‍याय संहिता २०२३ कलम ३२६ (क) अन्‍वये शाहुनगर पोलिस ठाण्‍यात तक्रार दाखल केली आहे.

पावसाळी कामांचा भाग म्‍हणून, मुंबई महानगरातील नद्या आणि नाल्‍यांमधील गाळ काढण्‍यात येत आहे. गाळ काढण्‍याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरु असून या कामी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) प्रणालीचा वापर केला जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून गाळ काढण्याच्या कामात परिणामकारकता व पारदर्शकता यामध्ये वाढ होण्यास मोठी मदत होत आहे. त्‍याचबरोबर बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरातील नाल्‍यांतून गाळ काढण्‍याच्‍या कामांची पाहणी व तपासणी प्रत्‍यक्ष भेट देऊन करत आहेत. तसेच, नालेसफाईची कामे सुयोग्‍य पद्धतीने करण्‍याचे निर्देश देत आहेत. मोठ्या व छोट्या नाल्‍यांमधील गाळ काढण्‍याचे काम पूर्ण झाले असले तरी भरतीसोबत तरंगता कचरा जमा झाल्‍यामुळे नालेसफाई वारंवार करावी लागत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्जन्य जलवाहिनी विभाग अव्याहतपणे काम करत आहे. नाल्यातून गाळ उपसा आणि कचरा बाहेर काढण्याचे काम नियमितपणे आणि वारंवार सुरू आहे. नाल्यांमध्ये कचरा जाण्यापासून रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. नाल्यांमध्ये येणा-या कच-यास प्रतिरोध करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर काही ठिकाणी जाळी बसविली आहे. तथापि, काही  व्‍यक्‍ती/ आस्‍थापना नाल्‍यांमध्‍ये थर्माकॉल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर, रॅपर्स असा विविध प्रकारच्या तरंगत्या वस्तू (फ्लोटिंग मटेरीअल) टाकत आहेत. त्‍यामुळे सांडपाणी वहन, निचरा होण्यास अडथळे निर्माण होत आहे.

धारावी येथील टी जंक्‍शनकडे जाणा-या नाल्‍याची महानगरपालिकेने नुकतीच स्‍वच्‍छता केली आहे. गाळ काढण्‍याबरोबरच तरंगत्‍या वस्‍तुदेखील काढण्‍यात आल्‍या. तथापि, सोमवार, दिनांक १६ जून २०२५ रोजी जी उत्‍तर विभागातील घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाच्‍या अधिका-यांनी पाहणी केली असता अज्ञातांनी या नाल्‍यात थर्माकॉल, रबर, रॅपर्स, पार्सल बॉक्‍स आदी औद्योगिक अशा विविध वस्‍तू टाकल्‍याचे निदर्शनास आले. त्‍याची गंभीर दखल घेत आणि वरिष्‍ठांच्‍या सूचनेनुसार, शाहुनगर पोलिस ठाण्‍यात तक्रार नोंदवण्‍यात आली आहे. नालेसफाईच्या कामात अडथळा निर्माण करणारी ही कृती गंभीर असून यामुळे आपत्ती व्यवस्थापनास अडचणी निर्माण होत आहे. यासंदर्भात भारतीय न्‍याय संहिता २०२३ कलम ३२६ (क) अन्‍वये दोषींवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांमार्फत संबंधित व्‍यक्‍ती/ आस्‍थापनाचा शोध घेतला जात आहे.

नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्माकोल अशा विविध वस्तू व तत्‍सम कचरा नाल्यांमध्ये किंवा गटारांमध्ये टाकू नये , जेणेकरुन कचरा अडकून नाले तुंबणार नाहीत आणि पाण्याचा जलद निचरा होत राहील. नाल्याच्या नजीकच्या परिसरात राहणाऱया रहिवाशांनी, नागरिकांनी नाल्यात थेट कोणताही कचरा न टाकता बृहन्मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करावे. कचरा केवळ कचरा कुंडीतच टाकावा. सर्वांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

पालिकानामा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 1 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे