मुंबई-हो ची मिन्ह सिटी सहकार्याला नवी दिशा; शाश्वत विकासासह व्यापार, पर्यटन व सांस्कृतिक देवाणघेवाणीवर भर
व्हिएतनामचे महावाणिज्यदूत ले क्वांग बिएन यांची महापौर रितू तावडे यांच्याशी भेट; सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीच्या मसुद्यावर चर्चा

मुंबई, प्रतिनिधी
: मुंबई आणि व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पुढे पडले आहे. व्हिएतनामचे मुंबईतील महावाणिज्यदूत ले क्वांग बिएन तसेच उपमहावाणिज्यदूत व्हू थी तू यांनी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची महापौर दालनात सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुंबई महानगरपालिका आणि हो ची मिन्ह सिटी यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची (MoU) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीच्या मसुदा आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या भेटीत शाश्वत नागरी विकास, आधुनिक पायाभूत सुविधा, व्यापार व गुंतवणूक, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रांमध्ये दोन्ही शहरांमधील सहकार्य अधिक व्यापक करण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला. मुंबई आणि हो ची मिन्ह सिटी या दोन्ही वेगाने विकसित होणाऱ्या महानगरांना भेडसावणाऱ्या नागरी आव्हानांवर परस्पर अनुभवांची देवाणघेवाण करून प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या शक्यतांवरही चर्चा झाली.
नागरी व्यवस्थापनातील आधुनिक व सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला. वाहतूक व्यवस्थापन, पायाभूत सुविधांचा विकास, शाश्वत शहरीकरण आणि नागरिकाभिमुख सेवा या क्षेत्रांत दोन्ही शहरांच्या अनुभवांचा परस्परांना लाभ होऊ शकतो, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
मुंबई आणि हो ची मिन्ह सिटी यांच्यातील सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता त्यातील उद्दिष्टांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी गतीशील आणि परिणामकारक कृती आराखडा तयार करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
या सहकार्यामुळे दोन्ही शहरांमध्ये आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांना नवी चालना मिळण्यासोबतच शाश्वत आणि सर्वसमावेशक नागरी विकासासाठी परस्पर सहकार्याचे नवे दालन खुले होईल, असा विश्वास या भेटीत व्यक्त करण्यात आला.