प्रभादेवी स्थानक परिसरात ‘पादचारी प्रथम’ला वेग; अतिक्रमणे हटवून वाहतूक व्यवस्था सुधारणार
प्रस्तावित पादचारी पुलाच्या कामालाही गती

प्रतिनिधी/मुंबई :
पादचाऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि अडथळामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानांतर्गत प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसरातील सुविधांमध्ये मोठे बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी मंगळवारी (१८ ऑगस्ट) प्रभादेवी रेल्वे स्थानक, प्रस्तावित पादचारी पूल (FOB), प्रवेश-निर्गमन मार्ग आणि परिसराची पाहणी करून विविध कामांना गती देण्याचे निर्देश दिले.
प्रभादेवी स्थानकातील विद्यमान पादचारी पुलाच्या प्रस्तावित जिन्याचे काम तातडीने पुढे नेण्याच्या सूचना त्यांनी पश्चिम रेल्वेला दिल्या. महापालिकेने ‘पे अँड यूज’ तत्त्वावरील प्रसाधनगृहासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने प्रस्तावित जिन्याच्या कामातील अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेने पुढील कार्यवाही वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले.
पादचारी पुलाच्या दक्षिणेकडील प्रवेश-निर्गमन मार्गाचे रुंदीकरण करताना तेथील प्रसाधनगृह हटविण्याची आवश्यकता भासल्यास, त्यासाठी पर्यायी प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही सांगण्यात आले. प्रस्तावित पादचारी पुलाच्या संरेखनाची व्यवहार्यता तपासून अंतिम निर्णय घ्यावा आणि पुलाच्या उतरणीसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेशी समन्वय साधावा, अशा सूचनाही पश्चिम रेल्वेला देण्यात आल्या.
अतिक्रमणांवर कारवाई, टॅक्सी व्यवस्थेत बदल
स्थानक आणि रेल्वे परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे प्राधान्याने हटविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. प्रवाशांना स्थानकातून बाहेर पडताना किंवा परिसरात ये-जा करताना अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रवेश-निर्गमन मार्ग मोकळे ठेवण्यावर भर देण्यात आला.
स्थानक परिसरातील गर्दी कमी करण्यासाठी शेअर टॅक्सी थांबे आणि टॅक्सी प्रवासी उतरण्याची ठिकाणे यांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आवश्यकतेनुसार या ठिकाणांचे स्थलांतर करण्याबाबतही कार्यवाही करण्यास सांगण्यात आले.
प्रवेश-निर्गमन मार्गांचे रुंदीकरण
प्रभादेवी रेल्वे स्थानक आणि परिसराची सर्वंकष स्वच्छता करण्याबरोबरच आवश्यक ठिकाणी संपर्क व पोहोच रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण (resurfacing) करण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्थानकाच्या उत्तर दिशेला नमन मीडटाउन आणि इंडिया बुल्स बिझनेस पार्कदरम्यान प्रवेश-निर्गमन मार्ग रुंदावण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली.
याशिवाय प्रभादेवी स्थानक परिसरात ‘आपला दवाखाना’ उभारण्याच्या प्रस्तावाचाही आढावा घेण्यात आला.
पादचारी, रेल्वे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना सुरक्षित, अडथळामुक्त व सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका, पश्चिम रेल्वे, एमएमआरडीए, एमआरआयडीसीएल आणि वाहतूक पोलिसांनी परस्पर समन्वयाने सर्व आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिले.
या पाहणीवेळी जी-दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह, वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) हिमांशू शर्मा, वरिष्ठ विभागीय अभियंता (मालमत्ता) अभिषेक मित्तल, विभागीय अभियंता (पूल) सुनील कुमार, एमएमआरडीएचे नरेंद्र साळवी, एमआरआयडीसीएलचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक असित राऊत, वाहतूक पोलिस उपायुक्त धाटे, वरळी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंगारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.