मानखुर्द येथे BEST बसचा भीषण अपघात; रस्त्यालगत उभ्या असलेल्या ज्येष्ठाचा मृत्यू, 8 जण जखमी
प्रतिनिधी | मुंबई
मानखुर्द येथे सोमवारी सकाळी BESTच्या बसचा भीषण अपघात होऊन रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर बसचालक, वाहकासह आठ जण जखमी झाले. जखमींवर राजावाडी आणि गोवंडी शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू असून बहुतांश जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
ही दुर्घटना सोमवारी सकाळी सुमारे 9.14 वाजण्याच्या सुमारास मानखुर्द येथील विश्वकर्मा रुग्णालयासमोरील मार्गावर घडली. BESTची मार्ग क्रमांक 501 ची बस अचानक रस्त्यावरील दुभाजकावर (डिव्हायडर) आदळली. धडकेचा जोर इतका होता की बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविले.
राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तिघांमध्ये बसचे वाहक वैभव वाघमारे (41) आणि चालक बनवारी श्रीराम प्रसाद शर्मा (51) यांचा समावेश असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, रस्त्यालगत दुभाजकाजवळ उभे असलेले भास्कर रावसाहेब पांडे (65) यांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दरम्यान, गोवंडी शताब्दी रुग्णालयात शिवमंगल मैती (42), गणेश पटेल (24), लता वाघेला (43), राजेश वरुगामिना (35) आणि अंकिता जाधव (22) यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून बसवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.