मुंबईत ८-९ ऑक्टोबरला सायरनचा आवाज घुमणार; घाबरू नका, ही आपत्कालीन चाचणी
फोर्ट परिसरातील जुने सचिवालय आणि क्रॉस मैदानातील नागरी संरक्षण महाविद्यालयात प्रोटोटाइप सायरनची चाचणी
मुंबई : मुंबई शहरातील नागरिकांना येत्या ८ आणि ९ ऑक्टोबरला सायरनचा आवाज ऐकू येणार आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. फोर्ट परिसरातील जुने सचिवालय आणि क्रॉस मैदानाजवळील नागरी संरक्षण महाविद्यालयाच्या इमारतीवर बसविण्यात आलेल्या प्रोटोटाइप सायरन उपकरणांची पूर्वनियोजित चाचणी या दोन दिवसांत घेण्यात येणार आहे.
या चाचणीदरम्यान सायरन वाजविण्यात येणार असून, मुंबईत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली नाही किंवा कोणताही धोका नाही, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
माननीय महासंचालक (नागरी संरक्षण), नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सी-डॉट) यांच्या पथकाने हे प्रोटोटाइप सायरन उपकरण विकसित केले आहे. त्याची कार्यक्षमता तपासण्यासाठी फोर्ट येथील जुने सचिवालय, जोड इमारत तसेच क्रॉस मैदान येथील नागरी संरक्षण महाविद्यालयाच्या इमारतीवर ही उपकरणे बसविण्यात आली आहेत.
सायरनचा आवाज ऐकून नागरिकांनी कोणताही गैरसमज करू नये. ही केवळ तांत्रिक चाचणी असून तिचा प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थितीशी कोणताही संबंध नाही.
महापालिका प्रशासनाने नागरिकांना चाचणीदरम्यान प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या अनधिकृत माहिती, अफवा अथवा चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.