रेबीजमुक्त मुंबई’साठी महापालिकेचा मोठा निर्णय
मिशन रेबीज इंडियासोबत तीन वर्षांचा करार, भटक्या श्वानांचे मोफत लसीकरण
प्रतिनिधी | मुंबई
मुंबईला २०३० पर्यंत ‘रेबीजमुक्त शहर’ बनविण्याच्या दिशेने बृहन्मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भटक्या श्वान आणि मांजरींमुळे होणाऱ्या रेबीजचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेने वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-होप/मिशन रेबीज इंडिया (WVS-HOPE/Mission Rabies India) या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत गुरुवारी (२३ जुलै) सामंजस्य करार (MoU) केला. या करारानुसार, मुंबईतील भटक्या श्वानांचे रेबीजविरोधी लसीकरण पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे.
महापालिका मुख्यालयात झालेल्या या करारावर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी उपआयुक्त (विशेष) विनायक विसपुते, देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण, मिशन रेबीज इंडियाचे संचालक आणि डब्ल्यूव्हीएस-होपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बालाजी चंद्रशेखर उपस्थित होते.
प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी सांगितले की, केंद्र सरकारने २०३० पर्यंत श्वानांपासून होणाऱ्या रेबीजचे निर्मूलन करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा निश्चित केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणासाठी भटक्या श्वानांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यावर भर दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रेबीजमुक्त मुंबई’ अभियानाला गती देण्यात येत आहे.
२०२६ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आलेल्या या कराराअंतर्गत मुंबईभर मोठ्या प्रमाणावर भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण (Mass Dog Vaccination), रेबीज सर्व्हिलन्स, जनजागृती आणि नागरिकांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत शिक्षण दिले जाणार आहे.
महापालिकेच्या मते, या उपक्रमामुळे केवळ भटक्या श्वानांचे लसीकरणच होणार नाही, तर माणसांमध्ये रेबीजचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारली जाईल. त्यामुळे मुंबईला ‘रेबीजमुक्त शहर’ बनविण्याच्या उद्दिष्टाला मोठी चालना मिळणार आहे.
