अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापौर रितू तावडे यांची निर्णायक मोहीम
पेडेस्ट्रियन फर्स्ट'ला लोकप्रतिनिधींचीही साथ
अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापौर रितू तावडे यांची निर्णायक मोहीम; ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ला लोकप्रतिनिधींचीही साथ
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील पदपथ अनधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमणांपासून मुक्त करण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना आता प्रशासनाचीही भक्कम साथ मिळाली आहे. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या ‘पादचारी प्रथम (Pedestrian First)’ मोहिमेचे महापौरांनी स्वागत करत, या उपक्रमात सर्व नगरसेवकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाला तातडीने विनंतीपत्र पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रितू तावडे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नाला प्राधान्य दिले असून, नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्रे, फेरीवाला समित्यांवरील नियुक्त्या आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर प्रभावी कारवाई यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे नोंदणीकृत आणि अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये स्पष्ट फरक करणे शक्य झाल्याने कारवाईला अधिक वेग मिळाला आहे.
दरम्यान, महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ३२२ किलोमीटर लांबीचे पदपथ पूर्णपणे अतिक्रमणमुक्त आणि अनधिकृत फेरीवालेमुक्त केले जाणार आहेत. शाळा, रुग्णालये, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके आणि बाजारपेठांच्या परिसरातील पदपथांना विशेष प्राधान्य देण्यात आले असून, नागरिकांना सुरक्षित आणि अडथळामुक्त पायी चालण्याचा अनुभव देण्यावर भर दिला जाणार आहे.
मुंबईतील एकूण २,३९२ किलोमीटर पदपथांपैकी पहिल्या टप्प्यासाठी ३२२ किलोमीटर पदपथांची निवड करण्यात आली आहे. परिमंडळनिहाय या मोहिमेची अंमलबजावणी होणार असून, त्यानंतर उर्वरित भागांतही टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाणार आहे.
महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले की, अनधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमणांचा प्रश्न केवळ प्रशासकीय कारवाईने नव्हे, तर लोकप्रतिनिधींच्या सहभागातून अधिक प्रभावीपणे सोडवता येईल. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
महापौरांच्या सूचनेनुसार, अनधिकृत फेरीवाल्यांसह बेवारस वाहने आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या इतर अतिक्रमणांवरही तातडीने कारवाई केली जाणार आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समन्वयातून ही मोहीम राबविल्याने स्थानिक स्तरावरील अडचणी जलद गतीने दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या मोहिमेमुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि अडथळामुक्त पदपथ उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून, अनधिकृत फेरीवालेमुक्त मुंबई घडविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.