मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; GMLR च्या बोगद्याचे खोदकाम सुरू
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली ५.३० किमी लांबीच्या दुहेरी बोगद्याचे काम; ‘तुळशी’ TBM कार्यान्वित — प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून २० मिनिटांवर येण्याची अपेक्षा

प्रतिनिधी/मुंबई :
पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा देणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (GMLR) प्रकल्पाच्या महत्त्वपूर्ण टप्प्याला सोमवार, १७ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली. गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगरदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या भूगर्भातून ५.३० किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्याचे खोदकाम अत्याधुनिक टनेल बोअरिंग मशीन (TBM) तंत्रज्ञानाने सुरू करण्यात आले.
या बोगद्यांच्या खोदकामासाठी वापरण्यात येणाऱ्या भव्य TBM ला ‘तुळशी’ असे नाव देण्यात आले आहे. प्रकल्पातील पहिल्या TBM ची जोडणी पूर्ण झाली असून तिची स्थळ स्वीकृती चाचणीही यशस्वी झाली आहे.
सहा मार्गिकांचा भुयारी मार्ग
GMLR हा मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना थेट जोडणारा १२.२० किलोमीटर लांबीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो चार टप्प्यांत राबविला जात आहे. टप्पा ३ (ब) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली प्रत्येकी तीन मार्गिकांचे दोन बोगदे उभारण्यात येत आहेत.
या प्रकल्पात १७ क्रॉस पॅसेज, ७२० मीटरचे दुहेरी पेटी बोगदे आणि गोरेगाव व मुलुंड येथे ६०० मीटरचे पोहोच रस्ते यांचा समावेश आहे. या टप्प्याची एकूण लांबी ६.६२ किलोमीटर आहे.
जंगल, जैवविविधतेला धक्का न लावता काम
राष्ट्रीय उद्यानाखालील बोगद्याचे काम करताना पर्यावरण आणि जैवविविधतेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. केंद्राच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडून आवश्यक पर्यावरणीय मंजुरी तसेच सर्वोच्च न्यायालयाकडून आवश्यक वृक्षतोड परवानगी मिळाली आहे.
प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सुमारे ९०६ प्रकल्पग्रस्तांचे कांजूरमार्ग येथे पुनर्वसन करण्यात येत असून, तळमजला अधिक २३ मजली अशा सहा इमारती उभारण्यात येत आहेत.
अत्याधुनिक सुविधांनी सज्ज बोगदे
बोगदा खोदण्यासाठी EPB (Earth Pressure Balance) TBM, तर क्रॉस पॅसेजसाठी NATM तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. बोगद्यांमध्ये यांत्रिक वायुवीजन, मिस्ट आधारित अग्निशमन व्यवस्था, CCTV, SCADA नियंत्रण प्रणाली, LED प्रकाशयोजना आणि आधुनिक दिशादर्शक फलक अशा सुविधा असतील.
याशिवाय बोगद्यांमध्ये उपयोगिता वाहिन्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक बोगद्यात १,८०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.
२१ टक्के काम पूर्ण; दुसऱ्या TBM चे खोदकाम ऑक्टोबरपासून
सद्यस्थितीत प्रकल्पाचे सुमारे २१ टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. पहिल्या TBM चे काम सुरू झाले असून, दुसऱ्या TBM ची जोडणी प्रगतिपथावर आहे. दुसऱ्या यंत्राद्वारे ऑक्टोबर २०२६ पासून बोगदा खोदकाम सुरू करण्याचे नियोजन आहे. संपूर्ण प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील १० वर्षे संचालन व देखभालीची जबाबदारी कंत्राटदाराची असेल.
९० मिनिटांचा प्रवास २० मिनिटांवर येणार
GMLR पूर्ण झाल्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांच्यात थेट संपर्क निर्माण होईल. त्यामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांमधील प्रवासाचा कालावधी सुमारे ९० मिनिटांवरून अवघ्या २० मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच इंधन आणि वेळेची बचत, आपत्कालीन सेवांचा जलद प्रतिसाद, व्यावसायिक व औद्योगिक वाहतुकीला गती आणि मुंबईच्या विद्यमान रस्ते जाळ्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास या प्रकल्पामुळे मोठी मदत होणार आहे.
मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या GMLR प्रकल्पातील बोगदा खोदकाम सुरू झाल्याने पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील थेट, वेगवान आणि अधिक सक्षम संपर्काच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.