गणेशोत्सवानंतर मुंबईत २७५४ मेट्रिक टन मूर्ती साहित्याचे संकलन
अनंत चतुर्दशीला एकाच दिवसात ५१० मेट्रिक टन साहित्याची वाहतूक; ७०७ वाहन फेऱ्यांतून मुलुंडच्या तात्पुरत्या केंद्रात साठवण
प्रतिनिधी/मुंबई :
श्रीगणेशोत्सवाच्या काळात विसर्जनानंतर निर्माण होणारे मूर्ती साहित्य जलस्रोतांमध्ये राहू नये, यासाठी मुंबई महापालिकेने राबविलेल्या विशेष मोहिमेत १६ ते २७ सप्टेंबरदरम्यान तब्बल २ हजार ७५४.८५ मेट्रिक टन साहित्याचे संकलन केले. हे साहित्य ७०७ वाहन फेऱ्यांद्वारे निर्धारित तात्पुरत्या साठवणूक केंद्रात हलविण्यात आले.
अनंत चतुर्दशीचा दिवस सर्वाधिक धावपळीचा ठरला. २६ सप्टेंबर रोजी तब्बल १३१ वाहन फेऱ्यांमधून ५१०.९२ मेट्रिक टन निर्माल्य व विसर्जनोत्तर मूर्ती साहित्य संकलित करून त्याची वाहतूक करण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांसह केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) शिफारशींच्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात आली. विशेषतः प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींचे अवशेष तलाव, समुद्र किंवा अन्य जलस्रोतांमध्ये कायमस्वरूपी राहू नयेत, यासाठी महापालिकेने स्वतंत्र प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार केली होती.
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबविण्यात आली.
पीओपीचे अवशेष जलस्रोतांपासून दूर
शाडू मातीच्या मूर्तींच्या तुलनेत पीओपी पाण्यात सहज विरघळत नसल्याने त्याचे अवशेष जलस्रोतांमध्ये राहण्याची शक्यता असते. विसर्जनानंतर ओलसर आणि ठिसूळ झालेल्या मूर्तींचे भाग वेगळे होऊ शकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणातील साहित्य कमी वेळेत बाहेर काढण्यासाठी आवश्यकतेनुसार यांत्रिक साधनांचाही वापर करण्यात आला.
महापालिकेच्या विभागनिहाय पथकांनी विसर्जित मूर्ती व त्यांचे अवशेष संकलित केले. स्वच्छ आणि झाकलेल्या वाहनांमधून हे साहित्य निर्धारित केंद्रापर्यंत नेण्यात आले. प्रत्येक वाहनाचे वजन वजनकाट्यावर करून त्याची नोंद घेण्यात आली. संकलनाची छायाचित्रे, व्हिडिओ आणि दैनंदिन प्रगती अहवालही जतन करण्यात आले आहेत.
के-पश्चिम विभाग आघाडीवर
परिमंडळनिहाय संकलनात के-पश्चिम विभागातून ३१४.८२ मेट्रिक टन, एस विभागातून २५३.५८ मेट्रिक टन, तर डी विभागातून २४९.४३ मेट्रिक टन साहित्य संकलित झाले.
विसर्जनानंतर संकलित करण्यात आलेले सर्व मूर्ती साहित्य मुलुंड येथील निर्धारित तात्पुरत्या साठवणूक केंद्रात आणण्यात आले आहे. पुढील टप्प्यात या साहित्याचा वैज्ञानिक व पर्यावरणपूरक पद्धतीने पुनर्वापर, पुनर्चक्रण अथवा पुनर्प्रक्रिया करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
गणेशभक्तांच्या उत्सवानंतर जलस्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या अविरत सेवेमुळे विसर्जनोत्तर स्वच्छता मोहिमेला मोठ्या प्रमाणात गती मिळाली.