मुंबईत मॅनहोल सुरक्षिततेसाठी ‘मॅनहोल रेलगार्ड’; महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेला सुरुवात
एल विभागात प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी; यशस्वी ठरल्यास संपूर्ण मुंबईत विस्ताराची शक्यता
मुंबई | विशेष प्रतिनिधी
मुंबईतील मॅनहोलची देखभाल व दुरुस्तीची कामे अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत मुंबई महानगरपालिकेने ‘मॅनहोल रेलगार्ड’ (Manhole Rail Guard) ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेली चौकोनी आकाराची ही सुरक्षा प्रतिकृती सध्या प्रायोगिक तत्त्वावर एल प्रशासकीय विभागात वापरात आणली जात आहे.
मॅनहोल उघडे ठेवून कामे सुरू असताना अपघात टाळणे, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळणे तसेच महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, एल विभागातील प्रायोगिक अंमलबजावणीदरम्यान या रेलगार्डच्या कार्यक्षमतेचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर तांत्रिक बाबी, प्रत्यक्ष कामाचा अनुभव, महानगरपालिका कर्मचारी तसेच नागरिकांकडून मिळणाऱ्या सूचना आणि अभिप्राय यांचाही विचार केला जाईल.
या पायलट प्रकल्पाचे निष्कर्ष समाधानकारक ठरल्यास ‘मॅनहोल रेलगार्ड’चा वापर मुंबईतील इतर सर्व प्रशासकीय विभागांमध्येही टप्प्याटप्प्याने करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि कर्मचाऱ्यांचे संरक्षण या दुहेरी उद्देशाने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.