बाणगंगा तलावात पोहायला गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू
अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले; रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले
प्रतिनिधी/ मुंबई, :
वाळकेश्वर येथील प्रसिद्ध बाणगंगा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी दुपारी सुमारे १.१० वाजता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने (MFB), पोलिसांनी, १०८ रुग्णवाहिका सेवेसह महापालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
बुडालेल्या तरुणाला अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावातून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र, एलिझाबेथ रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
मृत तरुणाचे नाव शेखर हरीश रावल (वय १९) असे आहे. या घटनेमुळे बाणगंगा तलाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तलावात पोहण्याच्या धोकादायक प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
घटनेची नोंद करून पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.