प्रत्येक प्रभागात रेबीज क्लिनिक; मुंबईचे २०३० पर्यंत ‘शून्य मृत्यू’चे लक्ष्य

मुंबई : विशेष प्रतिनिधी
मुंबईत रेबीज निर्मूलनाच्या मोहिमेला आता अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असून, महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात स्वतंत्र रेबीज क्लिनिक सुरू करण्याचा मानस महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला आहे. या क्लिनिकमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळासह रेबीज प्रतिबंधक लस आणि आवश्यक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे. २०२५ मध्ये मुंबईत रेबीजमुळे एकही मृत्यू नोंदविला गेला नसून, २०२७ पर्यंत मुंबईला ‘रेबीज-कंट्रोल्ड एरिया’ आणि २०३० पर्यंत ‘शून्य मृत्यू’चे लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
जागतिक रेबीज दिनानिमित्त भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात ‘मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा’ शुभारंभ महापौर रितू तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माहितीपत्रकाचेही अनावरण करण्यात आले.
महापौर तावडे यांनी सांगितले की, रेबीजविरोधातील लढाईत मुंबईने महत्त्वाची प्रगती केली आहे. २०२५ मध्ये रेबीजमुळे एकही मृत्यू न होणे ही महत्त्वाची कामगिरी आहे. मात्र, हीच कामगिरी पुढे कायम ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागात स्वतंत्र रेबीज क्लिनिक, २४ तास लसीकरण सुविधा आणि श्वानदंशानंतर तातडीने उपचाराची व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात येणार आहे.
श्वान पकडण्यासाठी प्रत्येक प्रभागात स्वतंत्र आणि समर्पित वाहने उपलब्ध करून देतानाच त्यामध्ये अद्ययावत पशुवैद्यकीय उपचार सुविधा असाव्यात, अशी सूचनाही महापौरांनी केली.

तीन वर्षांत १.६५ ते १.८० लाख श्वानांचे लसीकरण
‘मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्पा’च्या दुसऱ्या टप्प्यात भटक्या श्वानांचे सातत्याने लसीकरण, लसीकरणाची व्याप्ती वाढविणे, नियमित सर्वेक्षण, श्वानदंशाच्या घटनांचे वेळेत निरीक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य दिले जाणार आहे.
आगामी तीन वर्षांत दरवर्षी सरासरी ५५ हजार ते ६० हजार श्वानांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार तीन वर्षांत सुमारे १.६५ लाख ते १.८० लाख श्वानांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे.
याशिवाय श्वान लोकसंख्या नियंत्रणासाठी विविध विभाग, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वय वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे.
पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार मोहीम
रेबीज निर्मूलनासाठी केवळ श्वानांचे लसीकरण पुरेसे नसून नागरिकांमध्ये जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याने दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेतून ५ लाख विद्यार्थी आणि ५ हजार शिक्षकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विशेष जनजागृती कार्यक्रम घेतले जाणार असून, उपनगरीय लोकल रेल्वे स्थानकांवरही रेबीज प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
आरोग्य विभागातील कर्मचारी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील विविध घटकांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे.
‘आपला दवाखाना’मध्ये लस आणि सीरम
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’मध्ये रेबीज प्रतिबंधक लस आणि सीरम उपलब्ध करून देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले.
प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्षाचा प्रश्न आता केवळ शहरापुरता मर्यादित राहिलेला नसून तो घराघरांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाय आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाच्या माध्यमातून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमाचे सहसंचालक डॉ. अजित शेवाळे यांनीही मुंबईच्या रेबीज निर्मूलन मोहिमेतील कामगिरीचे कौतुक केले. देशातील महत्त्वाच्या शहरांच्या तुलनेत मुंबईने रेबीज निर्मूलनासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये महत्त्वाची प्रगती केली असून, २०३०च्या उद्दिष्टासाठी केंद्राकडून आवश्यक सहकार्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला उपायुक्त (विशेष) विनायक विसपुते, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहअधिष्ठाता डॉ. शैलेश इंगोले, डब्ल्यू.व्ही.एस. यूके मिशन रेबीजचे संचालक डॉ. अँडी गिब्सन, महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख डॉ. कलिमपाशा पठाण, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी आदी उपस्थित होते.