प्रतिनिधी/ मुंबई :
ईद-ए-मिलादनिमित्त बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी सार्वजनिक सुटी असली, तरी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मुंबईकरांना कुटुंबासह प्राणिसंग्रहालयाला भेट देण्याची संधी मिळणार आहे. मात्र, त्यानंतर गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी उद्यान व प्राणिसंग्रहालय बंद राहणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.
भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाला दर बुधवारी साप्ताहिक सुटी असते. मात्र, बुधवारी सार्वजनिक सुटी आल्यास नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने यापूर्वीच विशेष निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, बुधवारी सार्वजनिक सुटी असल्यास त्या दिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय खुले ठेवण्यात येते आणि त्याऐवजी पुढील दिवशी साप्ताहिक सुटी दिली जाते. त्यामुळे यंदा ईद-ए-मिलादनिमित्त २६ ऑगस्ट रोजी सुटी असूनही प्राणिसंग्रहालय सुरू राहणार आहे.
सुट्टीचा दिवस प्राणिसंग्रहालयासाठी, तर गुरुवारी साप्ताहिक बंद असा बदल करण्यात आल्याने नागरिकांनी याची नोंद घेऊन भेटीचे नियोजन करावे, असे महापालिका प्रशासनाने आवाहन केले आहे.