मुंबईकरांसाठी आता ‘वैद्य एआय’ची आरोग्यसेवा; WhatsApp वर मिळणार उपचारांची माहिती मुंबईकरांसाठी आता ‘वैद्य एआय’ची आरोग्यसेवा
WhatsApp वर मिळणार जवळच्या रुग्णालयांची माहिती; प्राथमिक उपचार, आरोग्य योजना आणि अभिप्रायाची सुविधाही
प्रतिनिधी/मुंबई :
मुंबईकरांना आरोग्यसेवा अधिक सहज आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘वैद्य एआय (Vaidya AI)’ WhatsApp चॅटबॉट नागरिकांच्या सेवेत आणला आहे. शुक्रवार, १४ ऑगस्टपासून ही सुविधा ९८९२९९३३६८ या WhatsApp क्रमांकावर उपलब्ध झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरातील आरोग्य संस्थांची माहिती, उपलब्ध वैद्यकीय सेवा तसेच विविध आरोग्य योजनांची माहिती घरबसल्या मिळणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि फ्रॅक्टल अॅनॅलिटिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील विविध सेवा आणि आरोग्य पायाभूत सुविधांची माहिती एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
घराजवळील आरोग्यसेवा एका क्लिकवर
नागरिकांना त्यांच्या घराजवळील रुग्णालये, दवाखाने आणि इतर आरोग्य संस्थांची माहिती WhatsApp चॅटबॉटच्या माध्यमातून मिळणार आहे. कोणत्या प्रकारच्या वैद्यकीय उपचाराची गरज आहे, त्यानुसार उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती शोधणे अधिक सुलभ होणार आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाशी संबंधित विविध योजना, त्यांचा लाभ घेण्याची प्रक्रिया तसेच आवश्यक माहितीही या चॅटबॉटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना या सुविधेद्वारे आरोग्य यंत्रणेबाबत आपला अभिप्रायही नोंदविता येणार आहे.
नागरिकांच्या माहितीवर आधारित आरोग्य व्यवस्थेला बळ
नागरिकांकडून वेळोवेळी अद्ययावत होणारी वैद्यकीय उपचारांशी संबंधित माहिती या डिजिटल प्रणालीसाठी महत्त्वाचा आधार ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या गरजा आणि उपलब्ध आरोग्य सुविधा यांच्यातील दुवा अधिक सक्षम करण्यास मदत होईल. आरोग्यसेवेतील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि त्यांचा अधिक परिणामकारक वापर यासाठीही या प्रणालीचा उपयोग होणार आहे.
बहुभाषिक संवादासह प्राथमिक उपचाराची मदत
‘वैद्य एआय’ हे केवळ माहिती देणारे व्यासपीठ न राहता नागरिकांशी संवाद साधणारे आरोग्य-केंद्रित AI व्यासपीठ म्हणून विकसित करण्यात आले आहे. नागरिकांशी संवाद वाढविणे, प्राथमिक टप्प्यातील उपचारांसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, बहुभाषिक नागरिकांशी संवाद साधणे आणि रुग्णालय प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करणे, अशी या प्रणालीची उद्दिष्टे आहेत.
तीन महिने प्रायोगिक वापर
महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेत तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ‘वैद्य एआय’ प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि अभिप्राय लक्षात घेऊन सुविधेत आवश्यक सुधारणा करण्यास मदत होणार आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी, नागरिकांना आपल्या परिसरातील आरोग्य संस्थांच्या सेवा तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ या चॅटबॉटच्या माध्यमातून अधिक सहजपणे घेता येईल, असा विश्वास व्यक्त केला.
आरोग्यविषयक माहितीसाठी WhatsApp क्रमांक : ९८९२९९३३६८