महापौरांच्या मध्यस्थीनंतर बाह्यस्रोत आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे
१८० दिवसांची सवेतन प्रसूती रजा मंजूर; वेतनवाढीचा प्रस्ताव सादर, वेतनविलंबाबद्दल कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई

प्रतिनिधी/मुंबई :
विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून आझाद मैदानात सुरू असलेले राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) बाह्यस्रोत आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या मध्यस्थीला यश आले असून, प्रशासनाने काही मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांनी गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आंदोलन मागे घेतल्याचे लेखी पत्र महापौरांना सादर केले.
मे. डी. एस. एंटरप्रायझेस या कंत्राटदार संस्थेमार्फत कार्यरत कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन ३१ ऑगस्टपासून सुरू होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत महापौर तावडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची सवेतन प्रसूती रजा
प्रशासनाने महिला कर्मचाऱ्यांच्या मातृत्वाच्या जबाबदाऱ्या आणि आर्थिक सुरक्षिततेचा विचार करून त्यांना १८० दिवसांची सवेतन प्रसूती रजा मंजूर केली आहे. कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनाचा प्रस्ताव प्रमुख कामगार अधिकारी आणि वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे. वेतन देण्यास विलंब केल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदार संस्थेवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.
वेतनासह अन्य समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी विशेष तक्रार निवारण समिती स्थापन करून कार्यवाही केली जाणार आहे. तसेच, सप्टेंबर २०२६ पर्यंतचे वेतन कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
सेवेत सामावून घेणे, बोनससाठी शासनाकडे पाठपुरावा
कोविड काळात मुंबईकरांना आरोग्यसेवा देणाऱ्या अनुभवी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी एकवेळचे धोरण लागू करणे आणि दिवाळी सानुग्रह अनुदान मंजूर करणे, या बाबी राज्य शासनाच्या अखत्यारीतील असल्याने महानगरपालिकेने शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे.
महापौरांच्या मध्यस्थीने झालेली कार्यवाही आणि प्रशासनाच्या सकारात्मक निर्णयांबद्दल समाधान व्यक्त करत कर्मचारी शिष्टमंडळाने महापौर दालनात रितू तावडे यांची भेट घेतली आणि आंदोलन मागे घेत असल्याचे लेखी पत्र सुपूर्द केले.
या वेळी स्वराज्य संघटनेचे युवक अध्यक्ष संतोष कदम, सचिव राहुल पाटील यांच्यासह गिरीश सुर्वे, परेश मेटकर, दीपक चव्हाण, प्रवीण चव्हाण, पंकज धाडवे, हर्षदा डुंबरे, प्रतीक्षा भागवत, रेश्मा कोचले आणि सुमन शिगवण आदी प्रतिनिधी उपस्थित होते.