मतदार यादी पुनरीक्षणाला गती द्या; विहित मुदतीत SIR मोहीम पूर्ण करा : निवडणूक आयोगाचे निर्देश
प्रतिनिधी, मुंबई : भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त ज्ञानेश भारती यांनी राज्यातील, विशेषतः मुंबई आणि कोकण विभागातील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) मोहीम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. उर्वरित कालावधीत घरभेटी, डिजिटलायझेशन आणि मतदार पडताळणीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेथे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अलीकडील मुसळधार पावसामुळे पुनरीक्षणाच्या कामावर परिणाम झाला असला, तरी आता केवळ दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असल्याने कामाला गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेने १०० टक्के मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नियुक्त केल्याबद्दल कौतुक केले. घरभेटींना प्राधान्य देण्याबरोबरच आवश्यक ठिकाणी विशेष शिबिरे आयोजित करून पुनरीक्षण मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी काही मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा इतर ठिकाणीही अवलंब करण्याचे आवाहन केले, जेणेकरून संपूर्ण प्रक्रिया विहित मुदतीत आणि अधिक परिणामकारक पद्धतीने पूर्ण होईल.
बैठकीनंतर ज्ञानेश भारती यांनी भायखळा विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बीएलओंशी संवाद साधत घरभेटी आणि डिजिटलायझेशनच्या प्रगतीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.