Breaking
ब्रेकिंग

स्थानिक परिस्थिती, वर्दळीच्या वेळा लक्षात घेऊन कचरा संकलनासाठी सूक्ष्म नियोजन करा

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांचे निर्देश

0 0 2 1 1 7

 

प्रतिनिधी मुंबई

_दिनांक ११ जून २०२५_

मुंबई महानगर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महानगरातील प्रत्येक मार्ग, गल्लीबोळ स्वच्छ ठेवायला हवे. रस्त्यावरील कचरा हा रोजच्या रोज उचलणे अपेक्षित आहे. यासाठी दोन सत्रांमध्ये (शिफ्ट) कॉम्पॅक्ट वाहनांचा वापर करावा. तसेच, सहायक मुख्य पर्यवेक्षक आणि कनिष्ठ अभियंता यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावरील (on field) उपस्थितीचा नियमित आढावा घ्यावा. सहायक आयुक्त यांनी आपापल्या विभागातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होणारी ठिकाणे, तेथील स्थानिक परिस्थिती आणि नागरिकांच्या वर्दळीच्या वेळा लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढवून नियोजनाचा सूक्ष्म आराखडा तयार करावा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.

घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात पश्चिम उपनगरातील सर्व प्रशासकीय विभागांच्या कामकाजाचा डॉ. अश्विनी जोशी यांनी के (पूर्व) विभाग कार्यालयात आयोजित बैठकीत आज (दिनांक ११ जून २०२५) आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

डॉ. अश्विनी जोशी पुढे म्हणाल्या, घनकचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियमितपणे फेस रिडिंग संयंत्राच्या माध्यमातून उपस्थितीची नोंद व्हायला हवी. सहायक आयुक्त यांनी आपापल्या विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा नियमित आढावा घ्यावा. सहायक मुख्य पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता आणि मुकादम यांनी परिसर स्वच्छतेचा दैनंदिन आढावा घ्यावा. त्यासोबतच प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर (on field) उपस्थित राहून आपापल्या अधिकारक्षेत्रातील परिसरात नियमितपणे परीक्षण करावे, अशा सूचनाही डॉ. अश्विनी जोशी यांनी यावेळी दिल्या.

उपायुक्त (परिमंडळ-४) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे, उप आयुक्त (परिमंडळ-७) श्री. संजय कुऱ्हाडे, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. किशोर गांधी, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर यांच्यासह पश्चिम उपनगरातील सर्व प्रशासकीय विभागांचे (वॉर्ड) सहायक आयुक्त तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
***

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

पालिकानामा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 1 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे