रामजीनगरमध्ये महिलांची ‘नरकयातना’! तुंबलेल्या शौचालयांमुळे उघड्यावर जाण्याची वेळ
दोन महिन्यांपासून तक्रारीकडे दुर्लक्ष; ‘एन’ विभागाला रोखठोक पत्र, तातडीने स्वच्छता-दुरुस्तीची मागणी, आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी/ मुंबई
मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याच्या गप्पा सुरू असतानाच घाटकोपर पश्चिमेतील रामजीनगर परिसरातील महिलांना मात्र मूलभूत सुविधेसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे समोर आले आहे. परिसरातील सार्वजनिक शौचालये तुंबल्याने निर्माण झालेल्या दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, काही महिलांवर रात्रीच्या वेळी उघड्यावर शौचास जाण्याची वेळ आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड. अमोल मातेले यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. त्यांनी मुंबई महापालिकेच्या परिमंडळ-६ चे उपायुक्त आणि ‘एन’ विभागाच्या सहायक आयुक्तांना ई-मेलद्वारे रोखठोक पत्र पाठवून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
दोन महिन्यांपूर्वी निवेदन, तरीही प्रशासनाची ‘सुस्ती’?
रामजीनगरमधील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था दूर करण्यासाठी ॲड. मातेले यांनी १५ जून २०२६ रोजी महापालिका प्रशासनाकडे प्रत्यक्ष निवेदन दिले होते. प्रशासनाने १६ जून रोजी निवेदन स्वीकारल्याची पोचही दिली. मात्र, त्यानंतर तब्बल दोन महिने उलटूनही परिस्थितीत कोणतीही ठोस सुधारणा झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महिलांचा संताप; व्यथा मांडताना अश्रू
दरम्यान, रामजीनगर परिसरातील स्थानिक महिला रविवारी सायंकाळी ॲड. मातेले यांच्या कार्यालयात पोहोचल्या. त्यांनी सार्वजनिक शौचालयांच्या दुरवस्थेची व्यथा मांडली.
शौचालये पूर्णपणे तुंबलेली असून परिसरात प्रचंड दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे महिलांना शौचालयाचा वापर करणेही कठीण झाले आहे. परिणामी, त्यांच्या आरोग्यासोबतच सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला असल्याचे महिलांनी सांगितले.
“महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?”
या प्रकारावर संताप व्यक्त करत ॲड. अमोल मातेले म्हणाले, “एकीकडे मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणायचे आणि दुसरीकडे आजही माता-भगिनींवर रात्रीच्या वेळी उघड्यावर शौचास जाण्याची वेळ येते, ही महापालिका प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. अंधारात बाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? महापालिका आयुक्त की ‘एन’ विभागाचे अधिकारी?”
महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि स्वाभिमानाशी संबंधित प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
“आजच्या आज शौचालये स्वच्छ करा; अन्यथा आंदोलन”
तुंबलेल्या शौचालयांची तातडीने साफसफाई करून आवश्यक दुरुस्ती सुरू करावी, अशी मागणी ॲड. मातेले यांनी केली आहे.
“महिलांच्या आरोग्याशी आणि स्वाभिमानाशी सुरू असलेला हा खेळ आता सहन केला जाणार नाही. प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर रामजीनगरमधील माता-भगिनींना सोबत घेऊन महापालिकेच्या ‘एन’ विभाग कार्यालयावर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
रामजीनगरमधील महिलांचा हा प्रश्न केवळ स्वच्छतेचा नसून त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानाशी निगडित आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आता तरी जागे होणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.