मुलुंडमध्ये ‘पादचारी प्रथम’चा दणका; ८४ अतिक्रमणे हटविली
४० पावसाळी छतांसह ८ दुकाने, ३० फेरीवाले आणि ६ वाहनमार्गांवर कारवाई पालिकेच्या ‘टी’, ‘एस’ आणि ‘एन’ विभागांची संयुक्त मोहीम; साहित्यही जप्त
.
प्रतिनिधी/मुंबई
पदपथ अडवून व्यवसाय करणारे फेरीवाले, अनधिकृत दुकाने आणि बांधकामांवर मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत मुलुंडमध्ये एकाच दिवशी ४० पावसाळी छत, ८ अनधिकृत दुकाने, ३० फेरीवाले आणि पदपथांना अडथळा ठरणारे ६ वाहनमार्ग हटविण्यात आले. पालिकेच्या ‘टी’, ‘एस’ आणि ‘एन’ विभागांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविले जात आहे. त्याचाच भाग म्हणून मुलुंडमध्ये मंगळवारी मोठी मोहीम हाती घेण्यात आली.
मुलुंड पश्चिम ते पूर्वेकडे कारवाई
उपायुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘टी’ विभागाच्या सहायक आयुक्त योगिता कोल्हे, ‘एस’ विभागाच्या सहायक आयुक्त समरीन सय्यद आणि ‘एन’ विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त कारवाई करण्यात आली.
मुलुंड पश्चिमेतील राम रतन त्रिवेदी मार्ग, जवाहरलाल नेहरू मार्ग, सेवाराम लालवाणी मार्ग, रतनजी हिरजी भोगराज मार्ग, झवेर मार्ग आणि गणेश गावडे मार्ग, तसेच मुलुंड पूर्वेतील लोकमान्य टिळक मार्ग आणि नवघर मार्ग परिसरात ही कारवाई झाली.
या कारवाईत पदपथांवर उभारण्यात आलेली ४० पावसाळी छत आणि ८ अनधिकृत दुकाने हटविण्यात आली. त्याचबरोबर पदपथ अडवून बसलेल्या ३० फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा ठरणारे ६ वाहनमार्गही निष्कासित करण्यात आले. अतिक्रमणासाठी वापरण्यात येणारे साहित्यही जप्त करण्यात आले.
१३ अभियंते, ६६ कामगारांसह यंत्रणा मैदानात
कारवाईसाठी परिमंडळ-६ मधील १३ दुय्यम अभियंते, ७ अनुज्ञापन निरीक्षक आणि ६६ कामगार तैनात करण्यात आले होते. त्यांच्यासोबत १० वाहने, ५ डंपर, ५ जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. कारवाईदरम्यान पोलिसांचा पुरेसा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
‘पदपथ पादचाऱ्यांसाठीच’
मुंबईतील पदपथ पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त आणि सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पदपथांवर अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम अथवा कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
‘पादचारी प्रथम’ अभियानातून मुंबईतील पदपथ मोकळे करण्याची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याने फेरीवाले, दुकानदार आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर पालिकेची कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.