मुंबई-III जलवाहिनीची गळती अखेर दुरुस्त
रात्री ९ वाजल्यापासून मुंबई शहरासह पूर्व उपनगरातील पाणीपुरवठा सुरळीत

प्रतिनिधी/मुंबई :
ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ३ हजार मिलिमीटर व्यासाच्या मुंबई-III जलवाहिनीला लागलेली गळती अखेर युद्धपातळीवर दुरुस्त करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल कार्य (नगरबाह्य) विभागाच्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण केले. जलवाहिनी पूर्ण क्षमतेने भारीत (Charged) झाल्यानंतर रात्री ९ वाजल्यापासून मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत होणार आहे.
मुंबई-III जलवाहिनीला गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी रात्री गळती आढळली होती. त्यानंतर जल कार्य (नगरबाह्य) विभागाच्या पथकाने तातडीने कार्यवाही करत जलवाहिनीवरील छिद्र लाकडी खुंटी बसवून तात्पुरत्या स्वरूपात बंद केले. त्याचवेळी जलवाहिनीच्या क्षतिग्रस्त भागाभोवती खोदकाम करून परिसर खुला करण्यात आला. तेथे साचलेले पाणी उपसून परिसर कोरडा करण्यात आला.
क्षतिग्रस्त भागावर मृदू पोलादाची (MS) पॅच प्लेट बसवून वेल्डिंगच्या माध्यमातून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, दुरुस्तीची प्रक्रिया सुरू असतानाच शनिवारी पुन्हा जलवाहिनीला गळती लागली. जलवाहिनीतील पाण्याच्या प्रचंड दाबामुळे दुरुस्तीच्या कामात मोठे अडथळे निर्माण झाले. परिणामी मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला.
या गंभीर परिस्थितीत पिसे उदंचन केंद्र आणि पांजरापूर जल शुद्धीकरण प्रकल्प यांच्याशी समन्वय साधत जलवाहिनीतील पाण्याचा दाब नियंत्रित करण्यात आला. त्यानंतर क्षतिग्रस्त दाबयुक्त जलवाहिनीची सुरक्षितपणे दुरुस्ती करण्यात आली.
अखेर महापालिकेच्या जल कार्य (नगरबाह्य) विभागाच्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने युद्धपातळीवर काम पूर्ण करत सायंकाळी ५ वाजता गळतीवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवले. आता जलवाहिनी भारीत झाल्यानंतर रात्री ९ वाजल्यापासून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.