प्रतिनिधी, मुंबई
दिनांक १३ जून २०२५
दरवर्षी दिनांक १४ जून रोजी साजऱया होणाऱया जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई सेंट्रल स्थित नायर रुग्णालय दंत महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ७१ जणांनी रक्तदान केले. बा. य. ल. नायर धर्मार्थ रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने आज (दिनांक १३ जून २०२५) नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, उद्घाटनप्रसंगी श्री. उघडे यांनी देखील रक्तदान करून इतरांनाही रक्तदान करण्याची प्रेरणा दिली. यावेळी पॅथॉलॉजी विभागाच्या प्राध्यापक तथा विभाग प्रमुख डॉ. मीनाक्षी बालसुब्रमण्यम्, सहयोगी प्राध्यापक डॉ. स्वीटी शिंदे यांच्यासह रूग्णालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या वतीने सन २००४ पासून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्याच परंपरेनुसार आज सकाळी १० ते दुपारी ३.३० या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरापूर्वी जनजागृती निर्माण करण्यासाठी रूग्णालयाच्यावतीने पत्रकांचे वाटप करण्यात आले. याला परिसरातील नागरिक, महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उद्या दिनांक १४ जून २०२५ रोजी जागतिक रक्तदाता दिनी नायर रुग्णालय दंत महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी रक्तदान करण्याची शपथ घेणार आहेत.
संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) तथा नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. (श्रीमती) नीलम अंद्राडे म्हणाल्या, “सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे साथीचे आजार वाढल्यास रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत प्लेटलेट्सची मागणी वाढते. त्यामुळे रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी रक्तपेढीमध्ये पुरेसा रक्तसाठा असणे आवश्यक आहे. तसेच रक्तदानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला हातभार लावण्याच्या उद्देशाने सदर रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. सन २००४ पासून दरवर्षी अशा स्वरूपाचे शिबिर आयोजित केले जाते,” असे त्यांनी नमूद केले.
